
सासरकडील मंडळी चित्रपट पाहायला गेल्याची संधी साधून जावयाने बनावट चावीने घर उघडून दागिन्यांची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी जावायाला जेरबंद केले करून त्याच्याकडून साडेतीन लाखांचे दागिने जप्त केले आहेत. त्याशिवाय दुसऱ्या घटनेत प्रवासादरम्यान वकिलाच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या चालकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 15 तोळे दागिने जप्त केले.
निखील संभाजी पवार (23, रा. संभाजीनगर चाळ, जयसिंगपूर, कोल्हापूर) असे अटक केलेल्या जावयाचे नाव आहे. हडपसरमधील सातेसतरानळी परिसरातील इंद्रायणी सोसायटीत 10 जुलैला घरफोडी झाल्याची तक्रार दाखल होती. पोलिसांकडून शोध घेण्यात येत असताना, जावयाने दागिने चोरून नेल्याची माहिती पोलीस कर्मचारी प्रशांत दुधाळ यांना मिळाली. पोलिसांनी निखिलला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सासरकडची मंडळी चित्रपट पाहायला गेल्याची संधी साधून बनावट चावीने फ्लॅट उघडून दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली. ही कामगिरी अपर आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी बजरंग देसाई, वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक विश्वास डगळे, एपीआय विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, अंकुश बनसुडे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान हंबर्डे यांनी केली.
वकिलाच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या चालकाला अटक
पुणे- प्रवासादरम्यान सुटकेसमधून 13 तोळे दागिन्यांची चोरी करणाऱ्याला हडपसर पोलिसांनी दापोडीतून अटक केली. जमील अयुब शेख (45, रा. दापोडी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अॅड. शिवाजीराव जनार्दनराव पाटील यांनी तक्रार दिली आहे. अॅड. पाटील हे महानगरपालिकेच्या पॅनलवर वकील आहेत. कार्यक्रमानिमित्त कर्नाटकमधील बिदर येथे जायचे असल्यामुळे त्यांनी घरातील 15 तोळे दागिने सुटकेसमध्ये ठेवून खासगी मोटारीतून प्रवास केला. त्यांचा नेहमीचा ड्रायव्हर नसल्याने त्यांनी पर्यायी चालक जमिल शेख याला वाहन चालवण्यास सांगितले. प्रवासादरम्यान त्यांच्या दागिन्यांची चोरी झाली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून आरोपी शेखचा पत्ता शोधला. एपीआय विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे पोलीस अंमलदार शाहीद शेख, अविनाश गोसावी, सुरज कुंभार यांनी दोन दिवस दापोडी भागात फिरून आरोपीचा माग काढला. त्याच्याकडून 13 तोळे दागिने जप्त करण्यात आले.



























































