एटीएम सेंटरमध्ये मदतीच्या बहाण्याने नागरिकांना लुटणारा सराईत अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एटीएम मशीनमधून रक्कम काढण्यासाठी नागरीकांना मदत करण्याचा बहण्याने डेबीट कार्डची अदला-बदली करून रक्कम चोरणाऱ्यास पुणे सायबर पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून 27 एटीएम कार्ड आणि 50 हजारांची रोकड जप्त करण्यात आली. संबंधीत गुन्हेगाराचा आंतरराज्य टोळीशी संबंध असून त्यादृष्टीने सायबर पोलिसांकडून तपास केला जात आहे.

अनुप शिवनारायण पाझरे (वय 33, रा. फुरसुंगी, मुळ रा. नागपुर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. बांधकाम प्रकल्पावर काम करणाNयाला एटीएम मशीनमधुन पैसे काढून देण्याचा बहाणा करुन चोरट्याने हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदली करून 74 हजार 760 रुपये काढून घेतले. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात होता. तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर सराईत अनुप पाझरे याने संबंधीत गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सायबर पोलिसांनी त्याला सांगवीतील एटीएम केंद्रासमोरुन ताब्यात घेतले.चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता, तेथे वेगवेगळ्या बँकांची 27 एटीएम कार्ड, 50 हजार रुपयांची रोकड, सोनसाखळी असा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलिस निरीक्षक कुमार घाडगे पथकाने केली.

चौकट-तेलंगाणासह राज्यात विविध ठिकाणी 7 गुन्हे दाखल

अनुप पाझरे याच्याविरुद्ध तेलंगणा राज्यातील आदिलाबाद, नागरपुरमधील हिंगणघाट, सावनेर,उमरखेड, खापरखेडा, कामाठी अशा पोलिस ठाण्यामध्ये 7 गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय पुण्यात कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये याच पद्धतीने नागरीकांची रक्कम लंपास केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.