
समीर डोंबे या तरुणाने इंजिनीयरिंगचे शिक्षण घेतले. काही काळ नोकरीही केली. मात्र पुन्हा वडिलोपार्जित अंजीर शेतीकडे वळले. अंजिराची आधुनिक शेती करत त्याला नावीन्यपूर्ण प्रयोगाची जोड दिली. एवढेच नव्हे, तर स्वतःच्या उत्पादनाचे योग्य मार्केटिंग करत ग्राहकांची साखळी जोडली. म्हणून सध्या अंजिराच्या शेतीतून वर्षाकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहे.
पुण्याच्या दौंड तालुक्यातील खोर गावात समीर डोंबे राहतात. त्यांची वडिलोपार्जित अंजीर शेती आहे. गावातील डोंबे वाडीत सगळे शेतकरी अंजिराचे पीक घेतात. समीर यांचे वडील मोहनराव डोंबे हे शिक्षक. समीर यांनी इंजिनीयरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर काही काळ कॉर्पोरेट नोकरीही केली. मात्र पुन्हा ते शेतीकडे वळले. आपल्या शेतातील अंजिरावर प्रक्रिया करून उत्तम विक्री व्यवस्थापनाच्या बळावर अनेक शेतकऱ्यांपुढे त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.
सुरुवातीला समीर यांनी अंजीर शेतीतील अडचणी समजून घेतल्या. थेट विक्रीवर भर दिला. वडिलोपार्जित साडेतीन एकरातील अंजीर शेती वाढवून आठ एकरात अंजीर उत्पादन घ्यायला सुरुवात केली. ‘पवित्रक’ नावाचा स्वतःचा ब्रँड सुरू केला. बॉक्समध्ये अंजिराचे व्यवस्थित पॅकिंग करून ठिकठिकाणी स्टॉल लावून विक्री सुरू केली. अल्पावधीतच चव आणि दर्जामुळे त्यांच्या शेतातील अंजीर लोकांच्या पसंतीस उतरले. हळूहळू अनेक शहरांतील सुपर मार्केटमध्ये अंजीर पोचले. सद्यस्थितीत डोंबेवाडी गावात एकूण 300 ते 350 एकर अंजीराचे पीक घेतले जाते. समीर यांनी गावातील शेतकऱ्यांची शेतकरी उत्पादक पंपनी तयार केलेय. त्यामार्फत इतर शेतकऱ्यांचा माल चांगल्या भावाने खरेदी करून विकत आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूरसह हैदराबाद, दिल्ली, सुरत, अहमदाबाद, तसेच रिलायन्स, स्टार, बिग बाजारसारख्या मोठय़ा मॉल्स सुपरमार्पेटमध्ये त्यांचे उत्पादन पोचत आहे.
उरलेल्या अतिरिक्त अंजिरांचे काय करायचे, हा विचार करत समीर डोंबे यांनी फूड प्रोसेसिंग युनिट सुरू केले. अंजिरावर प्रक्रिया करून अंजीर जाम बनवला जात आहे. सध्या अंजीराची 70 ते 80 रुपये किलो दराने विक्री केली जाते. येत्या काळात अंजीर पावडर, अंजीर वाईननिर्मितीवर त्यांना काम करायचे आहे.
शेतीला व्यवसाय म्हणून बघा
कस्टरम डेटा असेल तर शेतकऱ्यांना कुणाकडे हात पसरायची वेळ येणार नाही. शेतकऱ्यांनी शेतीला व्यवसाय म्हणून बघितले पाहिजे. सरकारच्या किंवा इतरांच्या मदतीकडे डोळे लावून बसण्यापेक्षा शेतकऱ्यांनी स्वतःचे मार्केट उभे केले पाहिजे. स्वतःच्या उत्पादनांचा ब्रॅण्ड तयार करून स्पर्धेत उतरले पाहिजे. तरच शेतकऱ्यांच्या मेहनतीला यश येईल, असे समीर डोंबे यांनी सांगितले. सुशिक्षित तरुण शेतात उतरला की करोडोचा टर्नओव्हर करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लॉक डाऊनमध्ये विक्री सुरूच
लॉक डाऊनमध्ये समीर डोंबे यांचे काम थांबले नाही. ग्राहकांसोबत त्यांचा थेट संपर्क असल्याच्या फायदा कोविड काळात झाला. त्यांच्याकडे ग्राहकांचे नंबर होते. त्यानंबरवर संपर्क साधून डोंबे यांनी ऑर्डर मिळवल्या. होम डिलिव्हरी केली. व्हॉट्सअॅपवर ऑर्डर घेऊन थेट ग्राहकांपर्यंत पोचले. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांनी अंजीर विकून सुमारे 13 लाखांची कमाई केली. एक किलोचाही माल फेकून दिला नाही, असे समीर यांनी सांगितले.































































