
पुणे शहरातील विविध भागात चोरट्यांनी घरफोडीचा धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिक भीतीखाली वावरत आहेत. चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करून चोर्या केल्या आहेत. अशीच एक घटना सिंहगड रस्त्यावर घडली असून बंद फ्लॅटचे कुलूप तोडून तब्बल 14 लाख 46 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. वारजे आणि उत्तमनगर येथेही दोन फ्लॅट फोडण्यात आले आहेत.
याप्रकरणी विजय गोखले (वय 6०) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय गोखले यांचा धायरतीत बंगला असून 17 नोव्हेंबरला ते सकाळी घराला कुलूप लावून कुटुंबासह बाहेरगावी गेले होते.
त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील रोकड आणि सोन्याचे दागिने मिळून 14 लाख 46 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
गोखले बुधवारी सायंकाळी घरी परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह इतरांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दुसर्या घटनेत चोरट्यांनी शिवणे परिसरातील बंद फ्लॅट फोडून सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी प्रवीण मोरे (वय 33) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसर्या घटनेत चोरट्यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश निर्मळ (वय 27) यांचा फ्लॅट फोडून 13 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस तपास करत आहेत. ऐन दिवाळीमध्ये चोरीच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. मूळगावी गेलेल्या नागरिकांच्या घराचे कुलूप तोडून चोरी केली जात असल्याचे घटनांवरून दिसून आले आहे.































































