पुणे – बालेवाडीत निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या मोटारीच्या धडकेत एक ठार, चार जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बालेवाडीत भरदुपारी मद्यधुंद अवस्थेतील एका सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाने भरधाव वेगात मोटार चालवून दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी दुपारी एक वाजता बालेवाडीतील ममता चौकात घडला.

याप्रकरणी पोलिसांनी मोटरचालक सेवा निवृत्त पोलिस निरीक्षक संजय वामनराव निकम (वय 58, रा. बालेवाडी) यांना ताब्यात घेतले आहे. अपघातामध्ये संतोष बन्सी राठोड (वय 35, रा.काळेवाडी) यांचा मृत्यू झाला. राजेश सर्वेश सिंग (वय 37 रा. ताथवडे), यशवंत भाऊसाहेब भांडवलकर (वय 29, रामनगर, माणिकबाग, सिंहगडरोड), दशरथ बबन माने (वय 27, रा. बालेवाडी), छोटू पंक्चरवाला, सलमान लाल तांबोळी हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी एक वाजता निकम मोटार घेऊन बालेवाडी येथील हायस्ट्रीट येथून जात होते. त्यांनी मद्यपान केल्यामुळे त्यांचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेली एकजण खाली पडला. मात्र दुचाकी मोटारीमध्ये अडकल्याने दुचाकीस्वाराला 100 मीटर फरफटत नेला. त्यानंतरही मोटार ममता चौकात रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका पंक्चरच्या दुकानामध्ये शिरली. तिथे तिघांनाही धडक बसल्यामुळे ते जखमी झाले. त्यानंतर मोटार जवळच थांबलेल्या टेम्पोला धडकली. अपघातानंतर नागरिकांनी निकमला जबर चोप दिला. स्थानिक नागरीकांनी जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी सांगितले.

असा झाला अपघात

भरधाव वेगात मोटार चालवीत निकमने दुचाकीस्वार तरूणाला 100 मीटर फरफटत नेले. त्यानंतर या भरधाव मोटारीने पंक्चरच्या दुकानात घुसून तेथील 3 जणांना उडवून जवळच थांबलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात एका नागरीकाचा जागीच मृत्यु झाला. तर दुसरा गंभीर जखमी आहे, तर अन्य चौघेजणही जखमी झाले आहेत.