
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने नकली पनीर बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली आहे. मे. आर. एस डेअरी फार्म या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा मारून नकली पनीर आणि पनीर बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा साठ जप्त करण्यात आला. ऐन सणासुदीमध्ये नकली पनीर बनवण्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली.
अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने या कारखान्यावर छापा टाकून 1 लाख 97 हजार 780 रुपये किंमतीचे 899 किलो नकली पनीर, पनीर बनविण्यासाठी वापरण्यात येणारी 2 लाख 19 हजार 600 रुपये किंमतीची 549 किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि 4 हजार 544 रुपये किंमतीचे 28.4 किलो आर. बी.डी. पामोलीन तेल असा एकूण 4 लाख 21 हजार 924 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला असून घेण्यात आलेले नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे.
टोल फ्री क्रमांक
सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.



























































