
सामना प्रतिनिधी। पुणे
तुफान पाऊस आणि धरणांतून सोडण्यात आलेल्या मोठय़ा प्रमाणातील पाण्याच्या विसर्गामुळे कोल्हापूर, सांगलीत जलप्रलय आला असून दोन्ही जिल्हे अक्षरशः बुडाले आहेत. कोकणात चिपळूण, खेडमध्ये तसेच सातारा जिह्यात कराडमध्येही पूरपरिस्थिती आहे. सांगली, कोल्हापुरातील सुमारे सव्वा लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. सरकारी यंत्रणा, स्थानिक प्रशासन, लष्कर, नौदल, एनडीआरएफ याबरोबरच सर्वसामान्य नागरिक मदतकार्यात उतरल्यामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळत आहे. या परिसरातील महामार्ग आणि रेल्वेसेवा ठप्प झाल्यामुळे संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या जलप्रलयामुळे संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली होती. यामध्ये पूरग्रस्तांना देण्यात येणाऱया नुकसानभरपाईमध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नुकसानभरपाईत वाढ
राज्यभरातील विविध जिह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. गावेच्या गावे पाण्याखाली गेली असल्याने सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून पाणी शिरल्यामुळे दिल्या जाणाऱया नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. ही रक्कम ग्रामीण भागासाठी 10 हजार, तर शहरी भागासाठी 15 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे
मुंबई-नाशिक महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू
मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटात दरड कोसळल्यामुळे जाणारी आणि येणारी वाहतूक एकाच मार्गाने सुरू आहे. त्यामुळे कसारा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आवळेधीवाडी येथे दरड कोसळल्याने नगर-कल्याणमार्गे होणारी वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे.
70 हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर
ठाणे, पालघर, कोकण, नाशिकसह कोल्हापूर, सांगलीत मोठय़ा प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यभरातील 70 हजारांहून नागरिकांचे स्थलांतर करावे लागले आहे. पूरग्रस्त भागातील शुद्ध पाण्याचा पुरवठा, वीजपुरवठा तसेच आरोग्य सेवांबाबत सतर्क राहा. रेल्वे यंत्रणेलाही पाऊस तसेच धरणांच्या विसर्गाची माहिती कळविण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी बुधवारी घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकाऱयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत पूर परिस्थिती आणि मदतकार्याची माहिती घेतली.
आरोग्यसेवेसाठी मुंबईतून पथके पाठवणार
साथीच्या आजारांचा अटकाव करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने उपाययोजना अधिक वाढवाव्यात. आवश्यकता भासल्यास मुंबई येथून वैद्यकीय पथकेदेखील पाठविण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्यात पूरग्रस्त भागात आरोग्य सुविधेसाठी सुमारे 162 वैद्यकीय पथके कार्यरत असून आवश्यकता भासल्यास अधिकची पथके पाठविण्यात येतील. औषधांचा साठा पुरेसा असून आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
नाटकांनाही फटका!
कोल्हापूर, सातारा, सांगलीतील पुरामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील पुराचा फटका आता मालिका आणि नाटकांनाही बसला आहे. पुरामुळे सध्या रंगभूमीवर धुमाकूळ घालणाऱया सुबोध भावेंच्या ‘अश्रूंची झाले फुले’ या नाटकाचा या भागातील दौरा रद्द करण्यात आला आहे.
पुणे-बंगळुरू महामार्ग बंद; 5 हजार ट्रक अडकले
पंचगंगा नदीला पूर आल्याने पुणे-बंगळूरू महामार्गावर चार फूट पाणी रस्त्यावर आले आहेत. यामुळे तब्बल 5 हजार ट्रक महामार्गावर अडकून पडले आहेत.
राधानगरीचे पाच दरवाजे पुन्हा उघडले
राधानगरी धरणाने धोक्याची पातळी ओलांडल्याने बुधवारी पुन्हा या धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले. तर कोयना धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे 6 वक्री दरवाजे 14 फुटांवरून 16 फुटांपर्यंत नेण्यात आले असूनत्यामुळे कोयनेसह कृष्णानदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाल्याने पूरस्थितीती अतीगंभीर होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कोकण रेल्वेची वाहतूक चार तास ठप्प
कोकण रेल्वे मार्गावर कुडाळ एमआयडीसी येथे बुधवारी सकाळी दरड कोसळली. शिवाय रेल्वे रूळाखालचा भराव वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली. रेल्वे गस्ती पथकाला ही घटना वेळीच लक्षात आल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. दरम्यान या मार्गावर धावणाऱया सर्व गाडय़ा ठिकठिकाणी स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या. यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. झाराप रेल्वे स्थानकात जामनगर एक्प्रेस, सावंतवाडीत नेत्रावती एक्स्प्रेस, कुडाळला भावनगर एक्स्प्रेस, कणकवलीत कोकणकन्या एक्स्प्रेस थांबवून ठेवण्यात आल्या.
सिंधुदुर्गात पूरस्थिती कायम
गेले तीन दिवस सिंधुदुर्ग जिह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुराच्या पाण्यात अडकलेल्या 160 ग्रामस्थांना आणि 51 जनावरांना शासकीय यंत्रणेने सुरक्षित स्थळी हलविले आहे. तसेच तिलारी धरणातील पाणी नदीमध्ये सोडण्यात आल्याने दोडामार्ग तालुक्यात सध्या पूरस्थिती आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचे पूर्ण लक्ष केंद्रित केले असून एनडीआरएफचे पथकही तैनात ठेवण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हय़ातील वशिष्ठा नदीला आलेला पूर अद्याप ओसरला नसल्याने चिपळूणमधील बहादूर शेख पूल वाहत्कीस बंद करण्यात आला आहे.
































































