पुणे – हप्ता न दिल्यामुळे सराईताचा राडा, मॅनेजरला मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॉटेल व्यवस्थापकाने हप्ता न दिल्याच्या रागातून सराईताने हातात कोयता घेऊन मॅनेजरवर वार करण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय साहित्याची तोडफोड करीत परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार केले.

ही घटना 13 नोव्हेंबरला रात्री अकराच्या सुमारास सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकात घडली. सुरज उर्फ गोट्या किरण लडकत (वय 32) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. याप्रकरणी सुधाकर डांगे (वय 26, रा. सोमवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

नरपतगिरी चौकातील हॉटेल राजधानीमध्ये सुधाकर व्यवस्थापक आहे. 13 नोव्हेंबरला रात्री अकराच्या सुमारास सराईत सुरजने मॅनेजर सुधाकरला हप्ता न दिल्याची विचारपूस केली. तुला मारूनच टाकतो, असे म्हणत त्यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करीत मी इथला भाई आहे, तुम्ही इथे धंदा करता, मला हप्ता देत नाही असे म्हणत दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक संजय माळी तपास करीत आहेत.