मुख्यमंत्री फडणवीसांना घेराव घालण्याचा मराठा आंदोलकांचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनोज जरांगे-पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले असतानाच राज्यभर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसत आहे. पुण्यात बुधवारी मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री गणेशदर्शनासाठी आले असताना निवासस्थानाबाहेर जमलेल्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

दरम्यान, राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य केल्या असून, एका मागणीबाबत कायदेशीर अडचण असल्याचे त्यांना स्पष्ट केले आहे. सरकारने नेहमीच चर्चेची दारे खुली ठेवली आहेत. त्यामुळे गणेशोत्सव सुरू असताना आंदोलनाचा निर्णय घेऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांना पुन्हा केले.