
सामना प्रतिनिधी । पुणे
राज्यातील मराठी शाळा बंद करू नका, मराठी शाळांचे सक्षमीकरण करा, अमराठी शाळांमध्ये पहिली ते बारावी मराठी सक्तीचा कायदा करा, या मागण्यांसाठी अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेने बालभारती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. यात बालसाहित्यिक आणि शिक्षणतज्ञ सहभागी झाले होते.
सर्व अमराठी शाळांत मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत शासनाने अध्यादेश काढला आहे. मात्र या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. मागण्यांसंदर्भातले निवेदनही बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांना संस्थेतर्फे देण्यात आले.
या वेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे, उपाध्यक्ष माधव राजगुरू, सहकार्यसह सुनील महाजन, ज्येष्ठ बालसाहित्यिक राजीव तांबे, शिक्षणतज्ञ डॉ. न.म. जोशी, आश्लेषा महाजन, कविता मेहेंदळे, डॉ. दिलीप गरूड, ज्योतिराम कदम, विद्या साताळकर, गिरीजा शिंदे, दीपाली शेळके, निकिता मोघे, महेश सोनवणे उपस्थित होते.
डॉ. न.म. जोशी म्हणाले, या राज्याची मातृभाषाच मराठी आहे. मातृभाषेचे जतन करण्याची जबाबदारी मराठी भाषिकांसह राज्य शासनाचीही आहे. त्यामुळे मराठी भाषेची सक्ती झालीच पाहिजे.
राजीव तांबे म्हणाले, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या काढत आहे. मराठी शाळेचा पट घटत आहे. त्यात सुधारणा झाली नाही तर मराठी शाळा बंद पडण्यास विलंब लागणार नाही. त्यामुळे शिक्षणात मराठी भाषा अनिवार्य केल्यास मातृभाषेला, मराठी शाळांना धोका निर्माण होणार नाही.
































































