पुणे बाजार समितीच्या डूप्लिकेट पावत्याद्वारे पार्किंग शुल्क वसुली, ठेकेदाराला आशीर्वाद नक्की कोणाचा !

पुणे बाजार समितीमध्ये पार्किंग ठेकेदारांकडून वाहनचालकांची पिळवणूक होत असल्याचे वारंवार समोर आल्यानंतर डूप्लिकेट पावत्यांचा भ्रष्ट्राचार समोर आला आहे. ठेकेदारांकडून डूप्लिकेट पावत्याद्वारे पार्किंग शुल्क घेतले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बाजार समितीचा सुरक्षा व अतिक्रमण विभागाचे पितळ उघडे पडले असून या प्रकार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पुणे बाजार समितीत ठेकेदारांनी पैसे कमविण्यसाठी सर्व सीमा पार केल्या आहेत. पहाटे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान ठेकेदाराचे कर्मचारी वाहनांमध्ये झोपलेल्या चालकांना उठवून दमदाटी करत पैसे वसूल केल्याचा प्रकार यापूर्वी समोर आला होता. तर अवेरिया एंटरप्रायझेस या ठेकेदाराला ठरवून दिलेल्या जागे व्यतिरिक्त रहदारीच्या अर्ध्या रस्त्यावर ताबा मारत पार्किंग शुल्क पैसे वसुली केल्याचे वारंवार समोर आले आहे. आता बाजार समितीतच्या शिवनेरी रस्त्यावर डूप्लिकेट पावत्याद्वारे पार्किंग शुल्क वसुली सुरू असल्याचे समोर आले आहे. वारंवार असे चुकीचे प्रकार घडत असताना बाजार समिती प्रशासन मात्र ठेकेदारांच्या पायाशी लोटांगण घालत असल्याचे दिसून येते.

मूळ पावतीवर पन्नास हजारांचा सेस जमा

10 सप्टेंबर 2023 रोजी 4839 या पावती क्रमांकाव्दारे मे सेजल ट्रेडिंग कंपनीने 44 हजार 19 रूपयांचा सेस बाजार समितीकडे भरला आहे. तर, 4839 याच पावती क्रमांकावरून 28 मे रोजी संतोष रेणुसे या नावावर 320 रूपये पार्किंग शुल्क वसुल केल्याचे समोर आले आहे.

बाजार समितीची हुबेहुब पावती तयार करून हा प्रकार केल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासून अशा प्रकारे पैसे वसुल करणार्‍यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जाईल.
– डॉ.राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे.