
मार्केटयार्ड भागातील अंगडीयाच्या (कुरिअर) कार्यालयावर दरोडा टाकून गोळीबार करत रोकड लुटणार्या टोळीतील आणखी दोघाांना गुन्हे शाखा यूनिट तीनच्या पथकाने अटक केली. तर, एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत.
संतोष बाळू पवार (वय – 23), साई राजेंद्र कुंभार (वय – 19, रा. पानशेत रस्ता, खानापूर, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मार्केटयार्डातील एका अंगडीयाच्या कार्यालयात गोळीबार करुन चोरट्यांनी 27 लाख रुपयांची रोकड लुटली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेने काही आरोपींना अटक केली होती. चोरट्यांचे साथीदार पवार आणि कुंभार यांचा शोध घेण्यात येत होता. या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने पवार, कुंभार यांना सापळा लावून गंगाधाम परिसरात पकडले. चौकशीत गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तुल अल्पवयीन मुलाकडे दिल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, अंमलदार राकेश टेकावडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.


























































