
पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात तोलाई वसुलीत लाखोंची सेटिंग होत असल्याचे समोर आले आहे. दोन लाखांपासून ते अठरा वीस लाखांपर्यंत थकबाकी असलेली तोलाईमध्ये सेटलमेंट करत त्यापैकी अर्धीच किंवा कमीत कमी रक्कम भरून घेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. एका प्रकरणात वीस लाख रूपयांच्या ठिकाणी साडेअकरा लाख भरून घेतल्याचे समोर आले आहे. तोलाई सेटलमेंटची चर्चा बाजारात होताच बाजार समितीतून तोलाई वसुली आणि थकबाकीची सर्व माहिती गायब झाली आहे. त्यामुळे बाजार समितीचे गैरव्यवहार थांबणार तरी कधी असा सवाल उपस्थित झाला आहे.
बाजार समिती आवारातील शेतमालाच्या खरेदी-विक्रीदरम्यान वजनमापांमध्ये तफावत होऊन, शेतकर्यांची फसवणूक होऊ नये म्हणून तोलणार्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तोलणारांकडून केवळ काट्यावर झालेल्या वजनाची नोंद घेण्याचे काम असते. सर्वच शेतमालाची नोंद तोलणार घेत नाहीत. मात्र शेतकर्यांच्या हिशेबपट्टीमधून न केलेल्या तोलाईच्या कामाचे पैसेदेखील आडतदार यांच्याकडून घेतले जातात. पूर्वी ही तोलाई माथाडी मंडळात भरली जायची मात्र तत्कालीन प्रशासक मधुकांत गरड यांच्या काळात बाजार समितीकडे तोलाई भरणा करण्याचे काम सुरू झाले. बाजार समितीने तोलाई वसुली करून द्यायची आणि त्यापोटी वसूल तोलाईच्या ५ टक्के कमिशन बाजार समितीला देण्याचे ठरले. मात्र, आज या तोलाई वसुलीत लाखो रुपयांची सेटलमेंट होत आहे. अनेक आडत्यांची पाच दहा लाखांची थकबाकी असेल तर सेटल करून कमीत कमी तोलाई भरून घेतली जात आहे.
तोलाई २० लाख ५० हजार भरून घेतले फक्त साडेअकरा लाख
बाजारातील एका मोठ्या आडत्याची सुमारे २० लाख ५० हजारांची तोलाई असताना त्याच्याकडून केवळ सुमारे ११ लाख ४० हजार रुपयेच भरून घेण्यात आले. उर्वरित रकमेचे काय झाले यावर कोणच काही बोलायला तयार नाही. यासह अनेक प्रकरणांमध्ये लाखो रुपयांची सेटलमेंट झाल्याची चर्चा आहे.
तोलणार आणि विभाग प्रमुख अडचणीत!
तोलाई भरून घेणारे तोलणार सांगतात की आम्ही फक्त तोलाई भरून घेतो बाकी माहिती आमच्याकडे नाही. तर, विभाग प्रमुख म्हणतात वसुली आणि थकबाकीची सर्व माहिती त्यांच्याकडे आहे. दोन्ही घटक अडचणीत आल्यामुळे आता एकमेकांकडे बोट दाखवण्याचा उद्योग सुरू झाला आहे.
तोलाई आणि लेव्ही या रकमामध्ये तफावत असल्याने रक्कम कमी जास्त होवू शकते. मात्र तोलणार प्रामाणिकपणे काम करत आहेत. – राजेंद्र चोरघे, अध्यक्ष, तोलणार संघटना, मार्केटयाड.
वसुली झालेली तोलाई आणि थकबाकीची संबंधित तोलणार यांच्याकडे वारंवार मागणी केली. मात्र, त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे यावर मला बोलता येणार नाही. – बाळासाहेब कोंडे, विभाग प्रमुख, फळे व भाजीपाला विभाग, मार्केटयार्ड































































