
पुणे येथील नामांकित महाविद्यालयात एमबीएला मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने चौघांनी तरुणाची 65 लाखांची फसवणूक केली आहे.
याप्रकरणी अंबर अनीष चॅटर्जी, अयान अनीष चॅटर्जी, आरती मनीष चॅटर्जी व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल अजय जिंदाल (वय 21, रा. हडपसर) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल व अंबर हे वर्गमित्र आहेत. कुणालला एमबीएला प्रवेश घ्यायचा होता. अंबरच्या माध्यमातून आपी अयानसोबत कुणालची ओळख झाली होती. त्यावेळा आरोपींनी कुणालला लवळे येथील एका नामांकित महाविद्यालयात ओळख असल्याचे सांगितले. त्याठिकाणी एमबीएला मॅनेजमेंट कोट्यातनू सहज प्रवेश मिळवून देतो, असे सांगितले. आरोपींनी कुणालशी गप्पा मारून विश्वास संपादन केला. त्यानंतर बनावट इमेल आयडी आणि एका लिंकवरून कॉलेजच्या नावाने बनावट मेल पाठविले. कुणालला कॉलेजला प्रवेश मिळाल्याची कागदपत्रे पाठविली. त्यासाठी आरोपींनी कुणालकडून वेळोवेळी पैसे घेतले.
त्याशिवाय आरोपींनी कुणालला कॉलेजच्या नावाने प्रवेश शुल्काच्या बनावट पावत्या पाठविल्या. आरोपींनी कुणालकडून तब्बल 65 लाख 69 हजार रुपये घेतले. मात्र, एमबीएला प्रवेश मिळवून दिला नाही. त्यामुळे कुणालने आरोपींकडे पैसे परत मागितले. आरोपींनी कुणालला शिवीगाळ करून दमदाटी केली. याप्रकरणी कोथरूड पोलीस अधिक तपास करत आहेत.


























































