
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पुणे मेट्रो प्रकल्पासाठी एएफडी फ्रान्स बँक आणि केंद्र सरकार यांच्यात आज 2 हजार कोटींचा करार झाला. लवकरच युरोपियन इन्व्हेसमेंट बँकेसोबतही 4 हजार कोटींचा करार होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.
येथील नॉर्थ ब्लॉकस्थित केंद्रीय आर्थिक विकास विभागाच्या कार्यालयात आज पुणे मेट्रोकरिता एएफडी फ्रान्स बँक आणि हिंदुस्थान सरकार यांच्यामध्ये 2 हजार कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. फ्रान्सचे हिंदुस्थानातील राजदूत अलेक्झेंडर झिजर, केंद्रीय मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ.सी.एस.मोहपात्रा यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. एएफडी फ्रान्स बँकेच्या हिंदुस्थानातील उपसंचालक क्लेमेन व्हीडल डी ला ब्लँच, महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आणि पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमन्यम यावेळी उपस्थित होते.
2020मध्ये पहिली लाइन पूर्ण होणार
सध्या मेट्रोचे 27 टक्के काम पूर्ण झाले असून या निधीच्या माध्यमातून कामाला गती येणार आहे. यावर्षाअखेर मेट्रोच्या व्यावसायिक परिचलनास सुरुवात करण्यासही याची मोठी मदत होणार आहे. तसेच वर्ष 2020मध्ये पुणे मेट्रोची 16 कि.मी.ची पहिली लाइन पूर्ण करणे व 2021पर्यंत मेट्रोची दुसरी लाइन पूर्ण करण्याचे उद्दिष्टही गाठण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुणे मेट्रोकरिता एकूण 11 हजार400 कोटींचा खर्च येणार आहे.
मेट्रो स्टेशनवर झळकणार पुण्याची गौरवशाली संस्कृती
पुण्याची खास ओळख असलेल्या पुणेरी पगडीच्या आकारात ‘डेक्कन जिमखाना’ व ‘संभाजी पार्क मेट्रोस्टेशन’ तयार करण्यात येत आहेत. तसेच शहराला असणारा संगीताचा वैभवशाली इतिहासही विविध संगीत वाद्य व कलाकृतींच्या माध्यमातून दिसणार आहे.
























































