
पुणे शहरातील विविध भागात मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून मोबाईल चोरीच्या पाच घटना घडल्या आहेत. दोन घटनात हातामधील मोबाईल हिसकावून नेला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाकडेवाडी परिसरातील नवीन बस स्थानक येथे तक्रारदार पराग श्रीनिवास कुलकर्णी (वय 35, रा. रावेत) मोबाईलवर कॅब बुक करत होते. त्यावेळी दोन अल्पवयीन मुलांना त्यांच्या हातामधील 25 हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून नेला होता. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
येरवडा परिसरात संतोष बाबाराम येडगे (वय 34, रा. रामनगर, येरवडा) हे मोबाईलवर बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातामधील 7 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून नेला. याप्रकरणी ऋतिक सागरे (वय 19, रा. सुरक्षानगर, येरवडा) आणि अनिकेत जाधव (वय 19, रा. अशोकनगर, येरवडा) यांना अटक करण्यात आली आहे.
कासेवाडी परिसरात भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या नागरिकाचा 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत कॅम्प ते मगरपट्टा असा पीएमपीएलने प्रवास करत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन एकाचा 7 हजारांचा मोबाईल चोरून नेला आहे.
याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर येथील गाडीत परिसरात पीएमपीमध्ये बसत असताना एका व्यक्तीचा गर्दीत 15 हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.


























































