
निवडणूक आयोगाच्या कारभारावर विरोधी पक्षांकडून वारंवार टीका होत आहे. तसेच जनतेचा देखील निवडणूक आयोगाच्या कारभारावर संभ्रम निर्माण झाल्यासारखे आहे. असे वातावरण असतानाच आता भाजप आणि निवडणूक आयोग यांच्यातील संगनमत समोर आले आहे. अॅड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपचा बुरखा फाडत भाजप पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणूक आयोग कसा काम करतो याचे धडधडीत पुरावेच सादर केले. पुण्यातील भवानी पेठेतील महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार कशा प्रकारे एका बंद खोलीत पालिका अधिकाऱ्यांनी प्रारुप याद्या बनवल्या याचे सीसीटीव्ही फुटेज आणि ऑडिओ रेकॉर्डिंग त्यांनी सादर केले. यामुळे निवडणूक आयोग आणि भाजप यांच्यातील संगनमत उघड झाल्याचा दावा या पत्रकार परिषदेत करण्यात आला.
या पत्रकार परिषदेत ३१ ऑक्टोबर रोजीचे महापालिकेच्या कार्यालयातील फुटेज दाखवण्यात आले. म्हणजे कोणाला कुठल्या प्रभागात टाकायचे, कुणाला काढायचे, कुणाला ठेवायचे हे आधीच ठरले होते, असा आरोप विश्वंभर चौधरी यांनी केला.
‘महाराष्ट्रात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने प्रारुप मतदार यादी २० नोव्हेंबर रोजी जाहीर केली. त्यावर हरकत घ्यायची मुदत २७ नोव्हेंबर पर्यंत होती. नंतर पुढे हरकतीची मुदत ३ डिसेंबरपर्यंत वाढवली. आता १० डिसेंबर रोजी निवडणूक आयोग नवीन प्रारुप यादी जाहीर करणार आहेत. पण त्याअगोदर हे गव्हर्नमेंट डॉक्युमेंट असताना, गुप्तता राखायची असताना देखील महानगरपालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयात भाजपचे काही लोक प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयामध्ये जाऊन बसलेले होते. त्यासंदर्भातील सीसीटीव्ही व्हिडीओ आम्ही मागितला होता. कारण क्षेत्रिय कार्यालयात भाजपचे पदाधिकारी बसलेले असतानाचा व्हिडिओत दिसत आहे. गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट असताना भाजपचे पदाधिकारी महापालिकेच्या ऑफिसमध्ये कडीलावून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मतदार याद्या चाळत होते. तसेच मतदार याद्यांमध्ये फेरबदल करण्याच्या सूचना संबंधित पालिका अधिकाऱ्यांना देत होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सारा प्रकार स्पष्ट दिसत आहे, की भाजपचे पदाधिकारी आणि पालिकेचे अधिकारी बसून वेगवेगळ्या प्रभागाच्या याद्या करत आहेत. त्यात वॉइस रेकॉर्डिंग देखील आहे. ज्यात कळत आहे की, अमक्या वॉर्डात भाजपचे लोक आहेत त्याची काळजी नाही, तो इथेच राहू दे. हा भवानी पेठतला आहे तो १७ नंबरमध्ये टाका किंवा हा २३ नंबर मध्ये टाका असे म्हणताना स्पष्ट ऐकायला येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोग हा कशाप्रकारे भाजपच्या आदेशाने चालत आहे हे स्पष्ट होत आहे. कारण भाजपचे पदाधिकारी हे मतदार याद्या घेऊन डिक्टेटेट करताहेत आणि त्याप्रमाणे कर्मचारी बदल करत आहेत’, असा आरोप या पत्रकार परिषदेतून करण्यात आला आहे.
पाहा संपूर्ण पत्रकार परिषद
‘भवानी पेठेच्या क्षेत्रिय कार्यालयात झालेले आहे. त्यावरून हे प्रकार सगळ्याच क्षेत्रिय कार्यालयात हे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे हे सेटिंग आहे, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहेच, पण हा लोकशाही प्रक्रियेवर टाकलेला दरोडा आहे’, असा हल्लाबोल अॅड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.
आताही हरकती आल्यानंतर देखील आयोग म्हणतो की या फेक तक्रारी आहेत, म्हणजे त्यांना तक्रारी निवारण करायचे नाही आणि याद्या तशाच ठेवायच्या आहेत, अशी शंका येते, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणात जे कोण लोक असतील त्यांची आम्ही नावे घेणार नाहीत, पण भाजपच्या संबंधित पदाधिकाऱ्यांसोबत हे अधिकारी दिसत आहेत. त्यांचे निलंबन करून चौकशी व्हावी. त्यांनी शासकीय गोपनीयतेचा भंग केला म्हणून त्याअंतर्गत भाजपची जी लोकं आहेत त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे.
तसेच जोपर्यंत विश्वसनीय प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात ही कामे होत नाहीत तोपर्यंत पुणे महानगरपालिकेची निवडणू्क पुढे ढकलण्यात यावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली.





























































