खून करीत दहशत माजविणार्‍या सराईत टोळीविरूद्ध मोक्का, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून कारवाईचा बडगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुन्या भांडणाच्या वादातून तरूणाचा खून करून परिसरात दहशत निर्माण करणार्‍या सुशांत ऊर्फ मट्या शशिकांत कुचेकर (टोळी प्रमुख) याच्यासह इतर सातजणांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्याने समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत नोव्हेंबर 2022 मध्ये तरूणाचा खून केला होता. दरम्यान, याप्रकरणी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी टोळीविरूद्ध मोक्कानुसार केलेली ही आठवी कारवाई आहे.

सुशांत ऊर्फ मट्या शशिकांत कुचेकर (वय 28 रा. नानापेठ, राजेवाडी, पुणे (टोळी प्रमुख) आदित्य राजु केंजळे (वय 18, रा. खडक चौक, धायरी) स्वरुप संतोष गायकवाड ( वय 18, रा. गुरुवार पेठ), राजन अरुण काऊंटर (वय 23, रा. नाना पेठ, राजेवाडी) तेजस अशोक जावळे (वय 32, रा. नानापेठ), अतिष अनिल फाळके (वय 27, रा.नानापेठ) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. संबंधित गुन्हयामध्ये महिला आरोपीविरूद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

आरोपी सुशांत ऊर्फ मट्या याने इतर साथीदारांच्या मदतीने प्रत्येक गुन्हयात संघटीत टोळी तयार करून गुन्हे केले. अवैद्य मार्गाने अर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने जबरी चोरी,जीवे ठार मारणे यासारखे गुन्हे वारंवार केले आहेत. 23 नोव्हेंबर 2022 मध्ये सुशांत ऊर्फ मट्या यासह साथीदारांनी जुन्या वादातून तरूणाचा खून केला होता. टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांच्यावतीने अपर आयुक्त राजेंद्र डहाळे यांना सादर केला. सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त संदीप सिंह गिल, एसीपी सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, एपीआय प्रसाद लोणारे, दत्तात्रय भोसले, प्रमोद वायकर, प्रमोद जगताप, संतोष थोरात, किरण शितोळे, हेमंत पेरणे, रहिम शेख निलम कर्पे यांनी केली.