पर्यटकांच्या भारामुळेच कोसळला कुंडमळा पूल, वाहून गेलेल्यांचे शोधकार्य थांबवले; गायब पालकमंत्री अजित पवारांचा शोध मात्र सुरू

तळेगावजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली भीषण दुर्घटना ही पुलावर आलेले दुचाकीस्वार आणि हुल्लडबाज पर्यटक यांच्या गर्दीमुळे पुलावर भार आल्याने झाल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत आणखी कोणी व्यक्ती बेपत्ता असल्याची कोणाची तक्रार आलेली नाही. त्यामुळे शोधमोहीम सायंकाळी थांबविण्यात आली. मात्र, जिह्याचे पालकमंत्री असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार एवढी गंभीर दुर्घटना घडूनही प्रचारात गुंतले आहेत. त्यामुळे गायब असलेल्या पालकमंत्र्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, 35 जखमींना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उपचार सुरू असलेल्या 16 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी-सिमेंट पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत वर्षा विहारासाठी आलेले पर्यटक नदीपात्रात पडले. या दुर्घटनेत रोहित माने (वय 35), विहान माने (वय 5, दोघे रा. प्रेमलोक पार्क, चिंचवड, मूळ रा. उजळायवाडी, कोल्हापूर), चंद्रकांत साठले (वय 45, रा. वानवडी, हडपसर), चेतन चावरे (वय 23, रा. तळेगाव दाभाडे) हे चार पर्यटक मृत्युमुखी पडले, तर 51 जण जखमी झाले. जखमींपैकी सहाजणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर लगतच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दुर्घटना घडल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस, एनडीआरएफ, लोणावळा शिवदुर्ग मित्र, वन्यजीव रक्षक मावळ, आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा प्रवाह, नदीतील धोकादायक खडक अशा प्रतिकूल परिस्थितीत या पथकांनी तातडीने बचाव मोहीम राबवत अडकलेल्या पर्यटकांची सुटका केली. तसेच, दोन मृतदेह बाहेर काढले. अंधार पडल्यानंतर उजेडासाठी जनरेटर मागविण्यात आला. पोलिसांनी चार मोठे व्रेन बोलावून पुलाचा सांगाडा उचकटण्यात आला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास पाच वर्षांच्या मुलासह आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात पथकाला यश आले. त्यानंतरही नदीपात्रात आणखी कोणी अडकले असण्याची शक्यता गृहीत धरून शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली. कोणी बेपत्ता असल्याची तक्रार नसल्याने रात्री साडेनऊच्या सुमारास शोधमोहीम थांबविण्यात आली.

नदीकाठी कोणी अडकल्याची शक्यता लक्षात घेऊन सोमवारी (दि. 16) सकाळी दहा वाजता पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. वन्यजीव रक्षक मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा या स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकांसह महाड येथून आलेल्या रेस्क्यू पथकानेही शोधमोहिमेत सहभाग घेतला. बोटींमधून तसेच ड्रोनद्वारेही नदीपात्रात शोधकार्य करण्यात आले. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे नदीपात्रात पाणीपातळीत वाढ झाली आहे. तरीही चार वाजेपर्यंत शोधमोहीम सुरू होती. त्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली.

अजित पवार गुंतले प्रचार कार्यात

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांना एवढी गंभीर घटना घडूनही घटनास्थळी भेट देण्यास वेळ मिळत नाही. अजित दादा पक्षाच्या प्रचार कार्यात गुंतले आहेत. मंगळवारी भोसरीत होणाऱया पक्षाच्या कार्यक्रमास येण्यासाठी अजित पवार यांच्याकडे वेळ आहे. मात्र, रुग्णालयात उपचार घेणाऱया जखमींना भेटण्याची साधी तसदीही त्यांनी घेतलेली नाही.

दुचाकीस्वार, सेल्फी अन् पूल कोसळला

कुंडमळा येथे फिरायला येणारे पर्यटकही बिनधास्तपणे पुलाचा वापर करत होते. धोकादायकपणे पुलाचा वापर केला जात होता. रविवारीही या पुलावर काही पर्यटक दुचाकी घेऊन आले. पुढे जाण्यावरून या दुचाकीस्वारांमध्ये वाद झाला. त्यातच काहीजण पुलावर उभे राहून सेल्फी काढत होते. दोन्ही बाजूंनी वाहने आली असताना देखील सेल्फी काढणारे पर्यटक वाहनांना जागा देत नव्हते. त्यामुळे पुलाच्या मध्यभागी एकच गर्दी झाली. त्यानंतर काही वेळातच प्रचंड मोठा आवाज झाला आणि मधोमध पूल तुटून कोसळला.