
चितेवर रॉकेल ओतल्याने भडका उडून गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुर्घनेत 7 ते 8 जण होरपळ्याची घटना 30 एप्रिलला रात्री पावणेसातच्या सुमारास राजा बहाद्दुर मिल रस्त्यावरील कैलास स्मशानभूमीत घडली होती.
अनिल बसन्ना शिंदे (वय 53) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गणेश सर्जेराव रणसिंग (वय 49 रा. वाघोली) याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. प्रतीक कांबळे (वय 24, रा. ताडीवाला रोड) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडीवाला रस्ता परिसरातील रहिवासी प्रतीक यांच्या वडिलांनी 30 एप्रिलला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर ससून रूग्णालयातील वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कैलास स्मशानभूमीत आणण्यात आला. चितेला अग्नी दिल्यानंतर गणेश यांनी प्लास्टिक कॅनमधील रॉकेल चितेवर ओतण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच वेळी स्मशानभूमीतील ब्लोअर यंत्रणा सुरु झाली. त्यामुळे कॅनमधील रॉकेलचा भडका उडून सात ते आठ जण होरपळले गेले. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, अनिल शिंदे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.




























































