‘शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ गाणं वाजलं, अन पोलिसच आले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ गाणं वाजलं अन पोलिसच आले. त्यामुळे ओली पार्टी करणे तरुणांना महागात पडले असून 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत गर्दी जमवून सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी गावातील हॉटेल सानवी रिसोर्टमध्ये पार्टीचे आयोजन करून महिलांसोबत डान्स करणार्‍या एका डॉक्टरसह 11 जणांविरूद्ध हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेलमालक विनय सुभाष कांबळे , डॉ. निखील भाकरे, संदीप कोतवाल, सचिन शिंदे, कालीदास काकडे, विठ्ठल मोरे, राजेश वाघमारे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

सिंहगड पायथ्याजवळील गावात पार्टीचे आयोजन करून नाचगाण्यांची पार्टी सुरू असल्याची माहिती पोलीस हवालदार नेताजी गंधारे आणि पासरलकर यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोळेवाडी गावातील हॉटेल सानवी रिसोर्टमध्ये छापा टाकला. त्यावेळी कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत गर्दी जमवून काहीजण साउंड सिस्टीमवर गाणे लावून नाचत होते.

त्यामध्ये विनय कांबळे, संदीप कोतवाल, सचिन शिंदे, कालीदास काकडे, विठ्ठल मोरे, राजेश वाघमारे  आणि चार महिला नाचत असताना मिळून आल्या. डॉ. निखील भाकरे अंधाराचा फायदा घेउन पळून गेला. संबंधिताविरूद्ध हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, नेताजी गंधारे, पासलकर, क्षीरसागर, मगेश भगत, अमोल शेडगे, नंदा कदम यांनी केली.