
‘कोरोना’मुळे प्रवासीसंख्येत झालेली घट विचारात घेता, पुढील काही दिवस फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठीच पीएमपीएलची बससेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी बसचा वापर करणे अपेक्षित नाही. आज सोमवारपासून पोलीस, अग्निशमन दल, महावितरण आदी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाNयांचे ओळखपत्र तपासून बसमध्ये प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती पीएमपीएल प्रशासनाने दिली आहे. ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे तीन-चार दिवसांपासून पीएमपीएलच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. रविवारी केवळ पाच हजारजणांनी बसप्रवास केल्याची नोंद आहे. या पाश्र्वभूमीवर सोमवारपासून (दि. 23) केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठीच बससेवा सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सध्या नागरिकांसाठी अग्निशमन, पोलीस, स्वच्छता, आरोग्य विभागातील कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. अशा कर्मचाऱ्यांना बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी केवळ 10 टक्के म्हणजेच 100 ते 150 बस रस्त्यावर सोडण्यात येणार आहेत. या बस वेळापत्रकानुसार धावणार नाहीत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे पाहूनच त्यांना बसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती पीएमपीएलचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली.
































































