आरोपीला मदत करणे भोवले, पुण्यात सहायक पोलीस निरीक्षक निलंबित

फोटो प्रातिनिधीक

ससून रुग्णालयात उपोषण करणाऱ्या निलंबित पोलीस शिपाई आरोपीला मदत केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक नीलेश सुरेश घोरपडे असे निलंबित करण्यात आलेल्याचे नाव आहे.

संवेदनशिल गुन्ह्यातील आरोपी शैलेश जगताप 11 ऑक्टोबरला ससून रुग्णालयात उपोषण करीत होता. त्यावेळी पुणे स्टेशन पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश घोरपडे आणि त्यांच्या टीमला ससून रुग्णालयात जाऊन जगतापचे समुपदेशन करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार घोरपडे ससून रुग्णालयात गेले असता, शैलेश जगतापने त्यांना रास्ता पेठेतील जागेचा ताबा घेण्यासाठी मोक्काचा गुन्हा दाखल करून दबाव आणला जात असल्याचे सांगितले. त्यामुळे उपोषण करीत असल्याचे जगतापने घोरपडे यांना सांगितले. मात्र, कर्तव्यावर असतानाही घोरपडे यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणली नाही. त्याची अनावश्यकरित्या स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्याचा रिपोर्ट दिला. त्याशिवाय संबंधित रिपोर्ट बऱ्याच व्हॉट्सअ‍ॅप गु्रपवर व्हायरल झाला. त्यामुळे शासकीय गोपनियेता भंग झाल्याचा आणि पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका घोरपडे यांच्यावर ठेवण्यात आला. त्याशिवाय आरोपीला मदत केल्याचा ठपका ठेउन त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या