पोलिसांची धडाक कारवाई, 3 आरोपींकडून 2 पिस्तूल, 3 जिवंत काडतुस जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी रात्री शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पुणे-नगर हायवेवरील शिरूर बायपास रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ धडाकेबाज कारवाई केली. पोलिसांनी 3 सराईत आरोपींकडून 2 पिस्तूल व 3 जिवंत काडतुसांसह 5 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी अझहर सफदर खान (27) रा.शिरूर भाजीबाजार, शिरूर, प्रदीप श्रीकिशन तिवारी (36) रा.बीसी हाऊसिंग सोसायटी शिरूर, सागर रामचंद्र धणापुरे (20) रा.सूर्यनगर तपोवन रोड नगर यांना अटक करण्यात आली असून त्यांचावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सदर आरोपी हे त्यांच्या ताब्यातील इंडिका व्हिस्टा कार नंबर MH 14 BR 6565 सह दोन बेकायदेशीर गावठी पिस्तूल, 3 जिवंत काडतुस अशी घातक शस्रांसह बिगर परवाना बाळगताना मिळून आले. जप्त मुद्देमाल व 3 आरोपीस पुढील कारवाईसाठी शिरूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली. सदरचे आरोपी हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांचे वर अनेक गुन्हे दाखल आहेत.