
पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील उमरटीमध्ये ऑपरेशन राबविले. तब्बल 105 अधिकारी कर्मचाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारून शस्त्र बनवणाऱ्या 50 भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. तसेच 21 पिस्तुले जप्त करीत 36 जणांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर आयुक्त मनोज पाटील, अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे उपस्थित होते.
पुण्यात पकडलेल्या आरोपींनी पिस्तुलांची खरेदी उमरटीतून केल्याचे स्पष्ट झाले. त्या ठिकाणाहून आंतरराज्यीय पिस्तुलांची तस्करी होत होती. त्या पाश्र्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ चारचे उपायुक्त सोमय मुंडे यांच्या पथकाने मध्य प्रदेशात धाव घेतली. 22 नोव्हेंबरला पहाटेच्या सुमारास ही कारवाई केली. यावेळी अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रास्त्रे तयार करण्याचे साहित्यही जप्त केले.
ड्रोनसह इतर साधनांचा वापर
कारवाईसाठी पोलिसांनी मोठी तयारी केली होती. 105 अधिकारी-कर्मचारी, ड्रोन, शीघ्र कृती दल, गॅस गन सेक्शन, वायरलेस, सीसीटीव्हीसह मध्य प्रदेश पोलिसांचा फौजफाटा मदतीला घेतला. तसेच मोबाइल सर्व्हिलन्स व्हॅन, बुलेटप्रूफ जॅकेट्स, बॉडी वॉर्न कॅमेरे यांचाही वापर करीत पिस्तूल बनवण्याच्या भट्ट्या नष्ट केल्या. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी स्वतः लीड करीत ऑपरेशन उमरटी यशस्वी केले.
पिस्तुलाचे ‘यूएसए’ ब्रँड
जप्त केलेली अवैध शस्त्रे ‘उमरटी शिकलगार आर्म्स’ (यूएसए) या नावाने तयार करून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, छत्तीसगडमध्ये विक्रीस पाठवली जात होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे चौकशी केली जात असून, चौकशीनंतर शस्त्रपुरवठा साखळीचा उलगडा होण्यास मदत होईल. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त सोमय मुंडे, पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, एपीआय नितीन नाईक, एपीआय मदन कांबळे, एपीआय कल्याणी कासोदे, पठाण, देशमुख, कानिफनाथ कारखेले यांच्या पथकाने केली.


























































