
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका जोमाने फैलाव करु शकतो. विशेषतः मध्यवर्ती भागासह मुख्य बाजारपेठांमध्ये गर्दीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष प्राधान्य देणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
पोलीस आयुक्तालयात आयोजित दिवाळीनिमित्त कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त मीतेश घट्टे, स्वप्ना गोरे, भाग्यश्री नवटके उपस्थित होते.
गुप्ता म्हणाले, दिवाळीनिमित्त शहरातील विविध भागात मागील काही दिवसांपासून गर्दी वाढत चालली आहे. त्यापार्श्वभूमीवर वाहतूककोंडी टाळण्यासाठी अतिरिक्त 200 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, तरीही काही भागांमध्ये गर्दीचे प्रमाण वाढत असल्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांना सूचित करण्यात येणार आहे. कोरोनोचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. कोरोनाच्या कालखंडातही खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगून पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. मध्यवर्ती भागांमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे संबंधित ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, स्वाती केदार-खाडे यांनी केले.
वाहतूक नियोजनासाठी जादा कर्मचारी मिळणार
शहरातील विविध भागात नेहमीपेक्षा दुपटीने वाहनसंख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडली आहे. त्यापार्श्वभूमीवर वाहतूककोंडी टाळण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी देण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे. त्यामुळे वाहतूक नियोजनाला जादा कर्मचाऱ्यांना बुस्ट मिळणार असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
अपर पोलीस आयुक्तांनी गायले गाणे
पोलीस आयुक्तालयात दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी गाणे गायिले. त्याशिवाय उत्तमनगर पोलीस ठाण्याचे हवालदार के. डी. देशमुख, मुख्यालयातील पोलीस नाईक संतोष भोईटे, संदीप सूर्यवंशी, संदीप वेंâगार यांनीही गाणे गात उपस्थितांची वाहवा मिळविली.

























































