वाहनजप्तीची भीती दाखवून उकळले अडीच हजार, सहायक पोलीस फौजदाराला 5 हजारांच्या दंडाची शिक्षा

870

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोटारचालकाला वाहनजप्तीची भीती दाखवत अडीच हजार रुपये उकळणाऱ्या सहायक पोलीस फौजदाराला 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू यांनी हे आदेश दिले आहेत. सहायक पोलीस फौजदार प्रकाश बाबुराव दौंडकर असे संबंधिताचे नाव आहे.

विमानतळ वाहतूक विभागात दौंडकर हे टेम्पोवर ऑपरेटर म्हणून कर्तव्यावर होते. 6 फेब्रुवारीला त्यांनी एकाची मोटार टो केली होती. त्यानंतर मालक मोटार सोडविण्यासाठी आले असता, दौंडकर यांनी वाहन जप्त करण्यासह आरटीओकडे जाऊन दंड भरावा लागणार असल्याची भीती त्यांना दाखविली. त्यानंतर टेम्पोचालक संजय बनसोडे व हेल्पर धर्मा यांच्यामार्फत वाहन मालकाकडे पैशांची मागणी केली.

दौंडकर यांनी मोटार मालकाकडून अडीच हजार रुपये घेतले. याप्रकरणी संबंधिताने वाहतूक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर वाहतूक उपायुक्त अक्कानुवरु यांनी तक्रारीची चौकशी केली. त्यामध्ये दौंडकर यांनी मोटार मालकाकडून पैसे घेतल्याचे आढळून आले. पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी दौंडकर यांना 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या