Pune Porsche Accident : पोर्श अपघातप्रकरणी आणखी दोघांना अटक

पुण्यातील कल्याणीनगर येथे एका अल्पवयीन मुलाच्या पोर्शने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या मुलाला वाचविण्यासाठी रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. त्यानंतर त्या मुलाच्या संपूर्ण कुटुंबियांसह ससून रुग्णालयातील काही डॉक्टरांना अटक केली होती. आता या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्यात या दोघांनी मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

पुण्यात हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे रक्ताच्या नमुन्यात फेरफार करण्यात आली होती. पण फक्त ओरोपीच्याच नव्हे तर गाडीत उपस्थित असलेल्या त्याच्या मित्रांचेही ब्लड सॅम्पल बदलण्यात आले होते. इतर मित्र दारूच्या नशेत नव्हते हे सिद्ध करण्यासाठी ही हेराफेरी करण्यात आली होती.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन आठवड्यांपूर्वी 900 पानांचे दोषारोपपत्र दाखल झाले होते. अल्पवयीन मुलाने अपघात केल्यापासून त्याला वाचविण्यासाठी कुटुंबातून तसेच ससून रूग्णालयाच्या पातळीवर अपघात करणार्‍या अल्पवयीन मुलाचेच रक्त बदलण्यात आले. यामध्ये बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या सांगण्यावरून त्याचा बांधकाम व्यावसायिक मित्र याने निवृत्त सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकार्‍याच्या मदतीने डॉ. तावरेची ओळख काढली होती. त्यानंतरच पैशांसाठी डॉ. तावरे याच्या सांगण्यावरून डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी अपघात करणार्‍या अल्पवयीयन मुलासह त्याच्या मित्रांचेही रक्त बदलले होते. यासाठी डॉ. हाळनोर याला अडीच लाख रुपये तर तर घटकांबळेला 50 हजार रूपये मिळाले होते. यात अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड यांची भुमिका महत्वाची होती. तर विशाल अगरवालची पत्नी शिवानी हिचे रक्त अल्पवयीन मुलाचे रक्त म्हणून तपासणीसाठी देण्यात आले होते, हे तपासात निष्पन्न झाले आहे.