
कझाकिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान या भागात आढणारे ग्रिफॉन हे दुर्मिळ गिधाड पहिल्यांदाच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पावर घिरटय़ा घालताना दिसले आहे. वनरक्षकांना या गिधाडाचे फोटो मिळाले असून त्याच्या पंखांवर नारंगी रंगाचा टॅग लावलेला आहे. टॅगमुळे हा पक्षी कोठून आला याची अधिक माहिती लवकरच पुढे येणार आहे. व्याघ्र प्रकल्पातील जंगली जयगड भागात गस्त घालत असताना वनक्षेत्रपाल स्नेहल मगर आणि वनरक्षक संतोष चाळके यांना हा पक्षी आकाशात घिरटय़ा घालताना दिसला. नेहमीपेक्षा हा पक्षी वेगळा असल्याने त्यांनी गिधाडाचे फोटो टिपले. सह्याद्रीत दिसलेल्या ग्रिफॉन गिधाडाच्या पंखावर टॅग असल्याने लवकरच त्याची अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक भाटे यांनी दिली.




























































