उदयोन्मुख रायझिंग गँगलाही मोक्काचा तडाखा, तंबी देउनही न सुधारल्याने १७ टोळ्यांचा बिमोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवनाथ शिंदे

गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी मागील दोन वर्षांपासून नव्याने उदयाला येणार्‍या टोळीविरूद्ध समुपदेशनासह कारवाई करण्याचा डोस दिला होता. सराईत गुंडांच्या विचारसरणीप्रमाणे टोळी तयार करणार्‍या मुलांना (रायझिंग स्टार्स) गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी भूमिका घेतली. विशेषतः उदयोन्मुख भाईंना बोलावून गर्भित इशाराही दिला होता. मात्र, पोलिसांच्या सुचनेकडे दुलर्क्ष करीत रायझिंग टोळ्यांनी गुन्हेगारीला खतपाणी घातले. त्यामुळे अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या शहरभरातील 17 रायझिंग स्टार गँगमधील तब्बल 117 गुंडाविरूद्ध मोक्कानुसार गोवण्यात आले आहे. त्यामुळे नव्याने उदयाला येणार्‍या गुन्हेगारी टोळ्यांवर जरब बसण्यास मदत झाली आहे.

पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक दोनने दीड वर्षापुर्वी शहरात नव्याने उदयाला येणार्‍या 26 उदयोन्मुख टोळ्यांतील गुन्हेगारांची यादी तयार केली होती. संबंधित ‘राइझिंग स्टार्स’च्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार प्रत्येक पोलिस ठाण्यातंर्गत विशेष लक्ष ठेवण्यात आले. गुन्हेगारी विश्वात पाउल ठेवण्याच्या तयारीत असलेल्या रायझिंग स्टार्सला वेळोवेळी पोलीस ठाण्यात बोलावून समुपदेशन करण्यात आले. त्याशिवाय गुन्हेगारी हरकतींविरूद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला. मात्र, अमुक-तमूक भाई डोळ्यासमोर ठेउन गँगमधील काही जणांनी ‘भाईगिरीची’ सुरूवात केली. व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणे, वाढदिवसाला तलवारीने केक कापणे, हातात शस्त्रास्त्र घेउन नाचणे, दहशतीसाठी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर शस्त्रास्त्रांचे व्हिडिओ अपलोड करण्यात आले. गुन्हेगारीकडे झुकणार्‍या अल्पवयीन मुलांना रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात हजेरी घेण्यात आली. मात्र, बहुतांश अल्पवयीन गुंडांनी पोलिसांच्या तंबीकडे दुर्लक्ष केले. दहशत माजविण्यासाठी त्यांनी गुन्हेगारीला अंगीकारल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांकडून रायझिंग स्टार्सचे रेकॉर्ड बनवून कारवाईची दिशा ठरविण्यात आली.

दिवसेंदिवस रायझिंग स्टार्स अल्पवयीनांच्या टोळयांकडून लुटमार, मारामारी, शरीराविरूद्धचे गुन्ह्यांचा आलेख वाढला होता. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध मोक्काचा प्रस्ताव तयार करून अस्तित्व संपविण्याच्या हालचालींना वेग देण्यात आला. खंडणी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी शहरातील विविध पोलीस ठाण्यातंर्गत गुन्हेगारीवृत्तीच्या 26 ‘राइजिंग स्टार्स’ची यादी तयार केली. संबंधित टोळ्यामध्ये 295 साथीदार गुन्हेगारीत सक्रिय असल्याचे दिसून आले. त्यानंतर प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत कार्यरत टोळ्यातील अल्पवयीनांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर हजेरी घेण्यात आली. त्यांना कायदा आणि नियमांची उजळणी वारंवार करून समुपदेशन करण्यात आले. मात्र, त्यानंतरही त्यांच्या वर्तुणूकीत बदल झाला नाही. त्यामुळे आतापर्यंत 16 रायझिंग गँगमधील तब्बल 117 उदयोन्मुख गुन्हेगारांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली. थेट मोक्कानुसार कारवाईमुळे नव्याने उदयाला येणार्‍या टोळ्यांतील दादा-भाईंचे धाबे दणाणले आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त तत्कालीन उपायुक्त श्रीनिवास घाडगे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने रायझिंग स्टार्स गँगने रेकॉर्ड तयार केले. त्यामुळे भविष्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासही मदत होणार आहे.

परिमंडळनुसार रायझिंग गँग टोळीप्रमुख

परिमंडळ एक- विशाल उर्फ जंगल्या सातपुते, मतीन अब्दुल रहीम सय्यद, साहिल अशोक राजपूत, कृष्णराज सुर्यकांत आंदेकर, सुरज अशोक ठोंबरे
परिमंडळ दोन- आकाश भरत थोरात, गणेश कवीश पवार, तौसिफ जमीर सय्यद,
परिमंडळ तीन- रोहित वसंत पासलकर, गौरव सुरेश पासलकर, पवन तुकाराम कुडले, नितीन रामदास सणस, नरेश सचिन दिवटे, सुनील उर्फ चॉकलेट किशोर डोईफोडे, जुबेर जाफर शेख, गणेश दत्तात्रय वैद्य, रोशन दयानंद लोखंडे,
परिमंडळ चार- आकाश वसंत कंचिले, विशाल गणेश कसबे, आकाश अशोक भातकर, सिराज अमीर कुरेशी
परिमंडळ पाच- रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण, किरण विनोद थोरात, जीवन गंगाराम कांबळे, योगिराज उर्फ योगेश संदीप पानसरे, रणजित उर्फ पप्पू रमेश नाईकनवरे

शहरात नवीन गुन्हेगारी टोळी तयार करण्याच्या तयारीत असलेल्या २६ राइझिंग स्टार्स टोळ्यांची यादी बनविण्यात आली होती. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून त्यांचे वारंवार समुपदेशनही करण्यात आले. मात्र, त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अशा रायझिंग गँगचे अस्तित्व संपुष्टात आणून बिमोड करण्यासाठी त्यांच्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली. अशापद्धतीने कारवाई सुरूच ठेवली जाणार आहे.
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर

गुन्हेगारीकडे कल असलेल्या उदयोन्मुख टोळ्यांची खंडणी विरोधी पथक दोनने माहिती काढली होती. त्यानुसार २६ रायझिंग गँगमधील गुन्हेगारांचे रेकॉर्ड तयार करण्यात आले. संबंधित माहिती प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर देण्यात आले हाेते. तसेच इतर गुुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या टोळक्यांवरही लक्ष ठेवण्यात आले.
बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक दोन