पुणे-संगमनेर-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गावर 18 बोगदे

दळणवळण अधिक गतिमान व्हावे, याकरिता आता प्रशासकीय पातळीवर अनेक कामांना वेग आलेला आहे. नाशिक आणि पुणे या दोन्ही महानगरांदरम्यान देशातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे धावणार आहे. नाशिक-पुणे दरम्यान रेल्वेसेवा सुरू करण्याची ही अनेक वर्षांची मागणी आता प्रत्यक्षात येणार असून, या कामाला लवकरच मुहूर्त लागणार आहे. दरम्यान, या मार्गावरील तब्बल 24 किलोमीटर लांबीचा प्रवास 18 बोगद्यांतून करावा लागणार आहे.

पुणे, संगमनेर आणि नाशिक या शहरांना जोडण्यासाठी परंपरागत पद्धतीच्या रेल्वेमार्गासह सेमी हायस्पीड रेल्वे सुरू केली जाणार आहे. जून 2020 मध्ये रेल्वे बोर्डाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आता महारेलने तयारी सुरू केली आहे.

या मार्गावरील 24 किलोमीटर लांबीचा प्रवास 18 बोगद्यांतून करावा लागणार आहे. बोगद्यांच्या या कामासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया महारेलने आता सुरू केली आहे. घाट सेक्शनमधील बोगद्यांच्या कामासाठी कंत्राटदारांकडून स्वारस्य देकार दोन दिवसांपूर्वी मागविण्यात आले आहेत. त्यानुसार या मार्गावर 18 बोगदे तयार करण्याचे नियोजन असून, त्यांची किमान लांबी 180 मीटर आणि कमाल लांबी 6.64 कि.मी. असेल.

पुणे, नाशिकला अतिरिक्त रेल्वेस्थानक

235 किलोमीटरचा हा लोहमार्ग असणार आहे. सेमी हायस्पीड रेल्वेबरोबरच सध्याची प्रवासी आणि मालगाडी धावण्यासाठीही या मार्गाची निर्मिती केली जाणार असून, ब्रॉडगेज मार्गावर सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग पहिल्यांदाच तयार केला जाणार आहे. पुणे, चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर, नाशिक असा हा मार्ग असून, यादरम्यान, 24 थांबे असणार आहेत. यासाठी पुणे-नाशिकला अतिरिक्त रेल्वेस्थानकाचीदेखील निर्मिती केली जाणार आहे.

41 उड्डाणपूल, 128 भुयारी मार्ग

नाशिक, पुणे आणि नगर या तीन जिह्यांतून हा मार्ग असणार आहे. पुणे ते हडपसर हा मार्ग एलिव्हेटेड असणार आहे. रेल्वे फाटकावर क्रॉसिंगची समस्या टाळण्यासाठी 41 उड्डाणपूल आणि 128 भुयारी मार्ग असणार आहेत. रेल्वेचा प्रवास प्रतितास 200 ते 250 किलोमीटर प्रतितास इतका जलदगतीने होणार असल्याने अवघ्या पावणे दोन तासांत नाशिक ते पुणे अंतर कापता येणार आहे.

नगर जिह्यात दळणवळणाची कामे प्रगतिपथावर

दळणवळण अधिक प्रभाव या खर्चाच्या विविध प्रकारचे विषय केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहेत. नगर जिह्यामध्ये कल्याण-विशाखापट्टणम या महामार्गाचे काम सुरू झाले असून, शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचेही काम सध्या सुरू झाले आहे. नगर-पुणे महामार्गाच्या सहापदरीकरणाचाही निर्णय झाला असून, जिह्यातील रेल्वेच्या दुहेरीकरणाचे कामही प्रगतिपथावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या