
सामना प्रतिनिधी। कवठे येमाई
पुणे नगर रस्त्यावर चोरांचा सुळसुळाट झाला आहे. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या महिलांबरोबरच या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांचे दागिने लांबविणारी टोळी अनेक दिवसांपासून येथे सक्रिय झाली आहे. कोरेगाव भिमा ता. शिरूर ते शिक्रापूर प्रवासा दरम्यान एका महिलेचे चौसष्ट हजार रुपयांचे दागिने महिला चोरट्यांनी लांबविले आहेत.
माधुरी जाधव ही महिला आपल्या मुलासह वाघोली येथून एम एच १४ बि टी ३१५८ या एस टी बस मधून प्रवास करत होती. तिने सर्व दागिने पर्स मध्ये ठेवले होते. त्याचवेळी दोन महिला एस टी बस मध्ये बसल्या. त्यांनतर काही वेळाने त्या महिला जाधव यांच्या जवळ आल्या आणि नंतर पुढे एस टी मधून खाली उतरल्या. त्यांनतर जाधव यांनी त्यांच्या पर्स मध्ये पाहिले असताना त्यांना त्यांचे दागिने नसल्याचे आढळून आले. याबाबत जाधव यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन अनोळखी महिलांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अनिल जगताप हे करत आहेत.





























































