पुणे – कोरोनामुळे जामीनावर सुटलेल्या कैद्याचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder-knife

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग होऊ नये यासाठी येरवडा कारागृहातून जामीनावर सोडलेल्या एका गुन्हेगाराचा पदपथावर झोपलेल्या अवस्थेत अज्ञातानी वार करून खून केल्याचा धक्कादायक घटना बंडगार्डन परिसरात घडली आहे. मुन्ना ईश्वर चव्हाण (वय 23) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे पोलीस ठाण्यातील हद्दीत चोरी केल्यामुळे मुन्नावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. तेंव्हापासून तो येरवडा कारागृहात होता. दरम्यान, कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आदेशानुसार अनेक कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे. त्यानुसार येरवडा कारागृहातून चार ते पाच दिवसांपूर्वी मुन्नाची जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर तो बंडगार्डन परिसरात पदपथावर राहत होता. सोमवारी सकाळी नागरिकांना एकजण पदपथावर रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसून आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या खिशामध्ये कारागृहातून सुटल्याबाबत कागद होता. त्यावरून पोलिसांनी त्याची ओळख पटवली.

दरम्यान, मुन्नाचा खून कोणी केला याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू केले आहे.