
माहेरून पैसे आणण्यासाठी शहरातील विविध भागात विवाहितांचा छळ केल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. त्यातील एका घटनेत महिलेने आत्महत्या केली आहे. वारजेत लग्नात काहीही न दिल्यामुळे हुंडा व दागिने माहेरून घेऊन येण्यासाठी विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे.याप्रकरणी पती व दीराला अटक करण्यात आली आहे.
विशाल मनोहर बराटे (वय 32) आणि तुषार मनोहर बराटे (वय 30, रा. वारजे गावठाण, रामनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत संगीता हरपाळे यांनी तक्रार दिली आहे. मे 2019 ते तीन जानेवारी 2021 दरम्यान ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संगीता यांची मुलगी प्रगती व आरोपी विशाल याचे मे 2019 मध्ये लग्न झाले होते. तेव्हापासून प्रगती ही सासरी नांदत होती. लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतरच विशाल व त्याच्या नातेवाईकांनी प्रगतीचा छळ सुरू केला. लग्नात 4 लाख रूपये खर्च झाला आहे. तू फुकटात आली आहेस. आम्हाला हुंडा म्हणून 50 हजार आणि दिवाळीला सासरच्या लोकांना देण्यासाठी 2 तोळे सोने घेऊन ये, नाहीतर तुला नांदविणार नाही. यासाठी तिला सतत टोचून बोलून शारीरिक व मानसिक छळ केला. छळाला कंटाळून रविवारी दुपारी प्रिती यांनी आत्महत्या केली.
दुकान सुरू करण्याची पैशांची मागणी
इलेक्ट्रीकचे दुकान सुरू करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यास सांगत मुंढव्यात विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 वर्षीय महिने तक्रार दिली आहे. त्यानुसार पती बशीर अहमद, सासू हसीना, दीर रियाज अहमद, नणंद नूरजहाँ यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
15 लाखांसाठी विवाहितेचा छळ
माहेरून 15 लाख आणि मोटार घेऊन येण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना सिंहगड रस्त्यावरील गणेश मळा परिसरात घडली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत 30 वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे. सुमित सुधीर पांढरे, सुधीप नारायम पांढरे आणि अमित सुधीर पांढरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




























































