
मौजमजेसाठी शहर परिसरातून दुचाकी वाहने चोरणाऱ्या सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून भारती विद्यापीठ, हडपसर आणि शिक्रापुर पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
शेखर चंद्रकांत चव्हाण (34, रा. हरणी, ता. पुरंदर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वाढत्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासह वाहनचोरीचे गुन्हे घडू नयेत, यासाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान लिपाणे वस्ती भागात एक संशयीत चोरीची बुलेट गाडी घेवून थांबल्याची माहिती अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे यांच्यासह पथकाला मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याच्याकडील बुलेट ही चोरीची असल्याचे समजले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आणखी चार दुचाकी चोरल्याचे कबूल केले. यानूसार पोलिसांच्या पथकाने चव्हाण याच्याकडून 2 लाख रुपये किंमतीच्या एकूण पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. चव्हाण हा सराईत वाहनचोर आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धीरज गुप्ता, अंमलदार सचिन गाडे, अभिजीत जाधव यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

























































