
वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्यासाठी जात असलेल्या दोन महिलांला पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दागिने लंपास केल्याच्या दोन घटना पुणे जिल्ह्यात घडल्या आहेत. याप्रकरणी विश्रांतवाडी व लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
देवाची उरळी येथे काल दुपारी बाराच्या सुमारास मैत्रिणीसोबत वडाची पूजा करून पायी घरी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील 75 हजार रूपये किंमतीचे 25 ग्रॅम वजनाचे दागिने हिसकावून नेले. याप्रकरणी सोनाली पवार (वय 29, रा. महालक्ष्मी पार्क, उरळी देवाची) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुचाकीवर पाठीमागे बसेलेल्या चोरट्याने सोनाली यांच्या गळ्यातील दागिने हिसकाविले. त्यावेळी त्यांनी आरडा-ओरडा करेपर्यंत चोरटे दुचाकीवरून पसार झाले. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धानोरी रस्त्यावरील भैरवनगर येथे राहणाऱ्या सुवर्णा मनोज गरसुंद (वय 48) गुरूवारी दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या नातेवाईकांसोबत घरी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी सुवर्णा यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण हिसका मारून चोरून गेले. सुवर्णा यांनी आरडा-ओरडा केला. पण, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू केला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत. मागील तीन वर्षापूर्वी शहरात वटपौर्णिमेच्या दिवशी 14 ते 15 महिलांच्या गळ्यातील दागिने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकाविले होते. घटनेनंतर प्रत्येक वर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी पोलिसांकडून रस्त्यावर गस्त वाढविली जाते. या वर्षी गस्त वाढविण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार गस्त सुरू होती. पण, तरीही सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत.
कात्रज परिसरात नागरिकाला लुटले
दुचाकीवरून घरी निघालेल्या तरूणाला कात्रज तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघांनी गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास अडविले. त्यांना हाताने मारहाण करून भिंतीवर ढकलून देत खिशातील 8 हजार रूपयांची रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी संतोष बाळाराम खेडकर (वय 52, रा. नवीन वसाहत, कात्रज) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.






























































