पुणेकर क्रिकेटवेडय़ांची विश्वकरंडक मिरवणुकीला उत्स्फूर्त गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एरवी केवळ टीव्हीवर आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा झळाळता करंडक बघणाऱया पुणेकर क्रिकेटवेड्यांनी मंगळवारी चक्क ‘याचि देही याचि डोळा’ हा विश्वकरंडक पाहिला. केवळ पाहिलाच नाही, तर विश्वकरंडकासोबत सेल्फीदेखील काढायला मिळाल्याने क्रिकेटप्रेमी आज दिवसभर जाम खूश होते. ढोल-ताशांच्या दणदणाटात निघालेल्या विश्वकरंडकाच्या मिरवणुकीला चाहत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उत्स्फूर्त गर्दी केली होती. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष व आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून विश्वकरंडकाची ही अभूतपूर्व मिरवणूक काढण्यात आली होती. तत्पूर्वी, ‘एमसीए’च्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संघटनेचे सर्व पदाधिकारी, आरएमडी ग्रुप, चिंचवड या शाळेचे विद्यार्थी, महाराष्ट्राचे 19 वर्षांखालील संघ (मुले व मुली), महाराष्ट्राच्या खेळाडू तेजल हसबनीस, किरण नवगिरे यांच्या उपस्थितीत विश्वचषकाचे पहिल्यांदा अनावरण करण्यात आले.