कृषी कायद्यांविरुद्ध भडका; हजारो शेतकऱयांचे ‘दिल्ली चलो’!

केंद्र सरकारने घाईगडबडीत केलेल्या कृषी कायद्यांविरोधात पुन्हा भडका उडाला असून, पंजाब-हरियाणातील हजारो शेतकऱयांनी दिल्लीवर धडक देण्यासाठी ‘दिल्ली चलो’चा नारा दिला आहे. मात्र, राजधानीकडे जाणाऱया सीमा सील केल्या आहेत. हरियाणातील भाजप सरकारने बळाचा वापर करीत कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारले, अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डल्या, लाठीमार केला. मात्र, शेतकऱयांनी या दडपशाहीला न घाबरता दिल्लीकडे कूच सुरू ठेवली आहे. यामुळे दिल्लीच्या सीमेवर मोठा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संतप्त आहेत. विशेषतः पंजाबमध्ये गेल्या दीड महिन्यापासून रेल रोको आंदोलन सुरू आहे. भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वाखाली 30वर शेतकरी संघटनांनी राजधानी दिल्लीत धडक देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी हजारो शेतकऱयांनी चार हजार ट्रक्स आणि ट्रक्टर-ट्रॉलीज घेऊन दिल्लीकडे कूच केली आहे. मात्र, भाजपच्या हरियाणातील सरकार आणि केंद्र सरकारकडून दडपशाही केली जात असून, शेतकरी संतप्त झाले आहेत.

आज पंजाबसाठी ‘26/11’ – सुखबिरसिंग बादल

केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारकडून शेतकऱयांचे आंदोलन चिरडले जात आहे. आंदोलन करण्याचा लोकशाही अधिकार आज संपविला आहे. आज पंजाबसाठी ‘26/11’ आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिरसिंग बादल यांनी दिली.

भाजप सरकारची दडपशाही

  • हरियाणा पोलिसांनी अमृतसर-दिल्ली महामार्गासह दिल्लीकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले आहे.
  • दिल्लीच्या सीमांवर ट्रक, वाळूने भरलेले ट्रक्टर्स पोलिसांनी आडवे लावले आहेत.
  • शांभू सीमेवर पोलीस आणि आंदोलक शेतकऱयांमध्ये धुमश्चक्री झडली. पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांडय़ा पह्डल्या.
  • कर्नालमध्ये पोलिसांनी लाठीमार केला. संतप्त शेतकऱयांनी बेरिकेटस तोडून नदीत फेकले.
  • पंजाबमधील शेतकऱयांच्या ‘दिल्ली चलो’ मार्चला हरियाणातील शेतकऱयांनीही पाठिंबा दिला आणि या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या