
पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेसपुढे आम आदमी पार्टीने तगडे आव्हान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर कंबर कसत निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या काँग्रेसने 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी हे चमकौर साहिब येथून तर नवज्योतसिंग सिद्धू अमृतसर पूर्वमधून निवडणूक लढवणार आहेत. सोनू सूदची बहीण मालविका सूदला मोगा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.
निवडणूकपूर्व सर्वेक्षणात पंजाबमध्ये ‘आप’ बाजी मारण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे काहीसा सावध पवित्रा घेत काँग्रेसने पहिल्या यादीत अनेक मातब्बर नेत्यांसह काही प्रसिद्ध नावांचा समावेश केला आहे. मानसा मतदारसंघातील विद्यमान आमदाराचे तिकीट कापून प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे निकटवर्तीय संदीप संधू यांना दाखा येथून तर राज्यसभा सदस्य आणि माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापसिंह बाजवा यांना कादियानमधून निवडणूक आखाडय़ात उतरवण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा हे डेरा बाबा नानक मतदारसंघातून लढणार आहेत.
विधानसभा उपाध्यक्षांचे तिकीट कापले
मलोटचे विद्यमान आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अजैबसिंग भट्टी यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्या जागी आम आदमी पक्षाला रामराम ठोपून काँग्रेसमध्ये आलेले आमदार रूपिंदर कौर रुबी यांना उमेदवारी दिली गेली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भठल हे लेहरा येथून लढणार आहेत.
पटियाला जेलमध्ये बंद असणाऱ्यांना उमेदवारी
मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले आणि सध्या पटियाला जेलमध्ये असलेले सुखपाल खैहरा यांना भुलत्थ येथून उमेदवारी देण्यात आली आहे. खैहरा हे ‘आप’मधून काँग्रेसमध्ये आले होते. ते भुलत्थ येथील आमदार आहेत.
निवडणूक प्रचारावर आता 22 जानेवारीपर्यंत निर्बंध
देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने प्रचारावर घातलेल्या निर्बंधांचा कालावधी वाढवला आहे. राजकीय पक्षांना आता 22 जानेवारीपर्यंत प्रचार करता येणार नाही. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने या राज्यांमध्ये आधी 15 जानेवारीपर्यंत प्रचाराला बंदी घातली होती. पाचही राज्यांत 22 जानेवारीपर्यंत जाहीर सभा, सायकल, बाईक रॅली, रोड शो, कॉर्नर सभांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र राजकीय पक्ष सभागृहात बैठकीचे आयोजन करू शकतात. या सभेला जास्तीत जास्त 300 किंवा सभागृहाच्या क्षमतेपेक्षा निम्म्या व्यक्तींनाच प्रवेश द्यावा लागणार आहे. दरम्यान, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर निवडणूक आयोग कारवाईचा बडगा उचलणार आहे. सर्व राजकीय पक्षांना सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमातून प्रचार करता येणार आहे. देशातील कोरोना परिस्थिती पाहता राजकीय पक्षांनी प्रचारासाठी सोशल मीडियाचाच जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भावाला तिकीट नाही
तिकीट वाटपात सिद्धूंचा दबदबा दिसून आला, तर मुख्यमंत्री चन्नी तिकीट वाटपात कमजोर असल्याचे दिसून आले आहे. त्यांना बस्सी पठाण येथून त्यांचे भाऊ डॉ. मनोहर सिंग यांना तिकीट मिळवून द्यायचे होते, पण तसे झाले नाही. त्यांच्या भावाने निवडणूक लढवण्यासाठी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदावरून निवृत्ती घेतली होती. सिद्धू यांनी बस्सी पठाण येथून गुरप्रीत जीपी यांना उमेदवारी दिली.
आपचे मोठे आव्हान
पंजाबमध्ये एका टप्प्यात विधानसभेच्या सर्वच्या सर्व 117 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेससमोर ‘आप’चे मोठे आव्हान राहणार आहे. चंदिगड महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने प्रचंड विजय मिळवला आहे. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. त्याशिवाय शिरोमणी अकाली दल, बसपा आणि भाजपचेही काँग्रेसला आव्हान असणार आहे.




























































