अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपवले

पूर्णा तालुक्यातील आडगाव (सुगाव) येथील एका अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान घडली.

मयत शेतकऱ्याचे नाव रामराव किशनराव पिडगे (५० वर्ष, रा. आडगाव (सुगाव) असे असून त्यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पूर्णा येथील बँकेचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, उडीद या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, तीन मुलांचा शैक्षणिक खर्च कसा भागवावा, वर्षभर संसाराचा गाडा कसा चालवावा, याच विवंचनेतून ते मागील काही दिवसापासून अस्वस्थ होते. त्याच नैराश्याच्या गर्तेत अडकून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आपल्या राहत्या घरी सायंकाळच्या सुमारास घराच्या खिडकीला गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलीस ठाण्याचे सपोनि सुशांत किंनगे, जमादार वसंत राठोड, विलास मिटके, कच्छवे, मुंडे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय पूर्णा येथे पाठवला. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.