
पश्चिम रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या राजधानी एक्प्रेसलाही पुढे आणि मागे अशी दोन इंजिने लावून त्यांची ‘पुश ऍण्ड पुल’ चाचणी घेण्यात येणार असल्याने मुंबई ते दिल्ली प्रवासात एक तासाची बचत होणार आहे.
सध्या मुंबई ते दिल्ली हे 1384 कि.मी.चे अंतर पश्चिम रेल्वेची राजधानी 15 तास 50 मिनिटांमध्ये कापते. सरासरी ताशी 130 कि.मी.च्या वेगाने हे अंतर कापले जाते. एका इंजिनाची सहा हजार हॉर्स पॉवर असते. त्यास आणखी एका सहा हजार हॉर्स पॉवर इंजिनाची जोड दिल्याने वेगात वाढ होणार आहे. या संदर्भातील सर्व परवानग्या मिळाल्या असून ‘पुश ऍण्ड पुल’ तंत्राने चाचण्या केल्या जाणार आहेत. आणि नेमक्या किती वेळाची बचत होते हे पाहून राजधानीचे नवे वेळापत्रक जारी करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
अशाच प्रकारे मुंबई सेंट्रल आणि हजरत निजामुद्दीन स्थानकात धावणाऱ्या ऑगस्टक्रांती राजधानी एक्प्रेसलाही डबल इंजिन लावून तिचाही वेग वाढविण्याची योजना आहे. डबल इंजिन लावल्याने ट्रेनला स्थानकातून बाहेरही वेगाने काढले जाते. त्यामुळे प्लॅटफॉर्मही जादा वेळ व्यापला जाणार नाही आणि प्रवाशांच्या वेळेतही बचत होणार आहे.
मध्य रेल्वेवरही झाला होता प्रयोग
अलिकडे मार्च महिन्यात मध्य रेल्वेच्या नाशिक मार्गे जाणाऱ्या नव्या सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्प्रेलाही ‘पुश ऍण्ड पुल’ तंत्राने डबल इंजिन लावण्यात आले होते. याशिवाय मध्य रेल्वेने मुंबई ते दिल्ली प्रवास वेगाने होण्यासाठी दर ताशी 160 कि.मी. वेगाने राजधानी धावण्यासाठी या मार्गाची क्षमता वाढविण्याची व्यापक योजना जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई ते दिल्ली अवघ्या दहा तासांत गाठणे शक्य होणार आहे.




























































