पुष्पक एक्सप्रेसचा डब्बा घसरला, आरपीएफ जवानामुळे दुर्घटना टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरपीएफ जवानाने दाखवलेल्या प्रसंगवधनाने शनिवारी मुंबई लखनऊ पुष्पक एक्स्प्रेसचा अपघात टळला. शनिवारी सकाळी 10:30 वा दरम्यान पुष्पक एक्स्प्रेस कसारा येथून सुटली. मात्र इगतपुरी स्थानकावर आल्यानंतर नाशिकला जात असतांना गाडीचा शेवटचा जनरल डब्बा रुळावरून घसरला. ही बाब आरपीएफ जवान किशोर बर्वे यांच्या लक्षात येताच त्यांनी याबद्दल गार्डला कळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

शनिवारी सकाळी मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या 12533 लखनऊ मुंबई पुष्पक एक्स्प्रेस ही गाडी इगतपुरी स्थानकावर आली. यानंतर गाडी नाशिकला रवाना होत असतांना गाडीचा मागचा जनरल डबा दोन नंबर प्लॅटफॉर्म वरून जात असताना घसरला. ही बाब तेथे असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे जवान किशोर बर्वे यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने धावत जाऊन गाडीतील गार्डला या बाबत कल्पना दिली. गार्डने तत्परता दाखवत त्वरीत प्रेशर डाऊन करून गाडी थांबविल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. यावेळी प्रवाशांनी स्टेशन परिसरात एकाच गर्दी केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर घसरलेल्या डब्यातील प्रवाशांना इतर कुठल्याही डब्यात बसण्याची परवानगी दिल्याने प्रवाशांमधील हा गोंधळ थांबला.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाच्या आपतकालीन विभागाने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर घसरलेला डब्बा बाजुला करण्याचे काम हाती घेण्यात आले. डबा रेल्वे रुळावर ठेवल्यावर गाडी पुढील प्रवासाठी दुपारी १ : ३० वाजेच्या सुमारास नाशिकच्या दिशेने रवाना करण्यात आली. रेल्वे खुरक्षा बलाचे जवान किशोर बर्वे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.