चंद्रपूरच्या ग्रामीण महिलेने बनवला बांबूचा क्युआर कोड स्कॅनर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांबूपासून विविध वस्तू बनवण्याऱया कलावंत अशी ओळख असलेल्या चंद्रपूरच्या ग्रामीण भागातील मीनाक्षी मुकेश वाळके यांनी बांबूपासून क्युआर कोड  स्कॅनर बनवला आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिला क्युआर कोड स्कॅनरआहे. प्लॅस्टिकपासून तयार होणाऱया क्युआर कोड  स्कॅनर हा चांगला पर्याय ठरू शकतो. या मॉडेलची अमेरिकेच्या जागतिक बांबू संघटनेनेही दखल घेतली आहे. 

चंद्रपूरच्या बंगाली कॅम्प झोपडपट्टी भागात राहणाऱया मीनाक्षी वाळके या प्रसिद्ध बांबू कलावंत आहेत. त्यांच्या बांबू राख्या विशेष लोकप्रिय असून या राख्या थेट युरोपात पोचलेल्या आहेत. कुठलाही वारसा किंवा पाठबळ नसताना त्यांनी अभिसार इनोव्हेटिव्ज नावाचा सामाजिक उद्यम सुरू केला आहे. झोपडपट्टी व ग्रामीण भागातील मुली आणि बायकांना प्रशिक्षण देऊन त्या रोजगार देत आहेत. आतापर्यंत मीनाक्षी यांनी बांबूपासून वेगवेगळे यशस्वी प्रयोग केले आहेत. बांबूपासून अतिथी बॅज, मंगल तोरण, फ्रेंडशिप बँड आणि क्राऊन डिझाइन केले आहेत. अमेरिकेच्या जागतिक बांबू संघटनेने त्यांचा बांबू क्युआर कोड स्कॅनरचे कौतुक केले आहे. स्वित्झर्लंड येथील एका कंपनीने हे मॉडेल बनवून देण्याची विनंती केली आहे, असे मीनाक्षी यांचे पती मुकेश वाळके यांनी सांगितले.

प्लॅस्टिकपासून होणाऱया प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विविध पर्याय शोधले जात आहेत. अशा वेळी प्लॅस्टिक क्युआर कोडला बांबूपासून तयार केलेला क्युआर कोड चांगला पर्याय ठरू शकतो. मीनाक्षी यांच्या कार्याबद्दल त्यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. मीनाक्षी सांगतात, बांबूची कला शिकायला अनेकजण तयार आहेत. पण त्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. जागा नाही, मशीन नाही. त्यामुळे शेकडो लोकांना रोजगार देण्यात अडचण येत आहे.

लॉकडाऊनमध्ये आमच्या बांबू व्यवसायाला चांगला फटका बसला. अशातच काही व्यापारी लोकांनी बांबूपासून क्युआर कोड मॉडेल बनवता येईल का, अशी विचारणा केली. मी ते आव्हान स्वीकारले. दोन महिन्यांपूर्वी त्यावर मी काम करायला सुरुवात केली. 15 सेमी उंच आणि 8 सेमी रुंद, 5 मिमी जाडीचे पहिले मॉडेल बनवले. ते हाताळण्यास एकदम सोपे आहे. 
– मीनाक्षी वाळके, बांबू कलावंत