कोरोनावरील लस न घेणाऱ्या नोवाक जोकोविचबाबत धक्कादायक माहिती उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविरूद्ध (Coronavirus) संरक्षण देणारी लस न घेतल्याने सर्बियाचा प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याला ऑस्ट्रेलियाने टेनिस स्पर्धेत भाग घेऊ दिला नव्हता. इतकंच नाही तर जोकोविचला ऑस्ट्रेलियातून त्याच्या देशात परत पाठवण्यात आलं होतं. लस घेणं टाळणाऱ्या जोकोविचबाबत एक धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. जोकोविच हा कोरोनापासून संरक्षण पुरवणारी लस निर्मिती करणाऱ्या एका बड्या कंपनीचा सह संस्थापक आहे. जोकोविचची या कंपनीमध्ये 80 टक्क्यांची भागीदारी असल्याची माहितीही उजेडात आली आहे.

क्वांटीबायोरेस (QuantBioRes) नावाची एक कंपनी असून ही कंपनी डेन्मार्क इथली आहे. या कंपनीचे सीईओ इव्हान लोनकारविच यांनी माहिती देताना म्हटलंय की या कंपनीमध्ये जोकोविच याची मोठी भागीदारी आहे. ‘जोकोविच हे माझ्या कंपनीचे सह संस्थापक आहेत’ अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

या कंपनीची सुरुवात 2020 साली करण्यात आली होती. या कंपनीमध्ये जोकोविच आणि त्याची बायको येलेना यांची 80 टक्के भागीदारी आहे. डेन्मार्क, स्लोवेनिया, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये या कंपनीची कार्यालये असून त्यात जवळपास 20 कर्मचारी काम करत आहेत अशी माहिती इव्हान यांनी दिली आहे. विषाणू आणि कोणत्याही औषधाला दाद न देणाऱ्या जीवाणूंशी लढणे हे आमच्या कंपनीचे उद्दीष्ट असल्याचं इव्हान यांनी म्हटलं आहे. यासाठी आम्ही कोरोना विषाणूला डोळ्यासमोर ठेवून कामाला सुरुवात केली असल्याचं इव्हान यांचं म्हणणं आहे.

लस न घेतल्याने नोवाक जोकोविच याला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भाग घेता आला नव्हता. यामुळे वर्षाच्या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळण्याचे आणि 21 वे जेतेपद मिळवण्याचे जोकोविचचे स्वप्न भंग पावले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. जोकोविच याला गेल्याच महिन्यात कोरोना झाला होता. त्यामुळे त्याला लसीकरणाच्या नियमातून सुरुवातीला सवलत देण्यात आली होती. ऑस्ट्रेलिया प्रशासनाने मात्र ही सवलत नामंजूर केली होती आणि त्याचा व्हीसा रद्द केला होता. हा वाद न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयानेही व्हीसा रद्द करण्याचा निर्णय योग्य ठरवला होता, ज्यामुळे जोकोविचला ऑस्ट्रेलियातून त्याच्या देशात पाठवून देण्यात आलं होतं.