
सामना प्रतिनिधी, नागपूर
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी महापालिकेकडून जागा मिळणार आहे. आम्ही लवकरच आयुक्तालय सुरू करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार हे अद्यापही अनिश्चितच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने “सुयोग” येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्रकारांशी बोलत होते. पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी आयुक्तालयासाठी नोटीफिकेशन काढले आहे. आयुक्तालय कसे असेल याची पदांची रचनाही स्पष्ट झाली आहे. आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी १५ आँगस्टपर्यंत पोलीस आयुक्तालय सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे यापूर्वी जाहीर केले आहे . पण पुढे काही झाले नाही.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारले असता ते म्हणाले, महापालिका आम्हाला एक जागा देत आहे. तेथे लवकरच पोलीस आयुक्तालय सुरू केल जाईल. लोकसभेच्या निवडणुका येतील, पण त्याचा आयुक्तालय सुरू करण्याचा काही संबंध येणार नाही.
आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या लवकरच
राज्यातील पुणे पोलीस आयुक्तांसह इतर वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा कार्यकाल पूर्ण होऊनही गृह विभागाने त्यांच्या बदल्यांचे आदेश काढलेले नाहीत. तसेच उपायुक्त किंवा पोलीस अधिक्षकांच्याहीव बदल्या रखडल्या आहेत. याबाबत विचारले असता, लवकरच यांच्या बदल्यांचे आदेश निघतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

































































