
सामना प्रतिनिधी । मुंबई
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सोमवारी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (नॅस)च्या धर्तीवरील लेखी सराव परीक्षा मुंबई महापालिकेच्या विद्यार्थी, शिक्षकांना नाहक त्रास देणारी ठरली. पालिका शिक्षण विभागाकडून या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तसेच उत्तरपत्रिका पुरविण्यात न आल्याने शिक्षकांनी व्हॉट्सअॅपवर आलेली प्रश्नपत्रिकेची ‘ईमेज’ वर्गातील फळ्यावर उतरवली. तर पदरमोड करून शिक्षकांनी उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना पुरविल्या. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी वह्यांमध्येच उत्तरे लिहिली.
2017-18 मध्ये झालेल्या नॅस सर्वेक्षणात मुंबई उपनगर जिल्हय़ातील विद्यार्थी हे मूल्यमापनात शेवटी आहे. त्यामुळे गुणवत्तावाढीसाठी प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्तीवर आधारित सराव परीक्षा घेण्यात येणार असून त्याची सुरुवात या महिन्यापासून झाली. पहिली ते पाचवीच्या चार तर सहावी ते दहावीच्या पाच विषयांच्या परीक्षा एकाच दिवशी घेण्यात आल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांची अडचण झाली. प्रत्येकी 30 मिनिटांच्या प्रत्येक परीक्षेसाठी एकेका विषयाची प्रश्नपत्रिका मोबाईलमध्ये पाहून शिक्षकांना फळ्यावर उतरवावी लागली. फळ्यावरील प्रश्न पाहून विद्यार्थ्यांनी कशीबशी त्याची उत्तरे लिहिली. या परीक्षेच्या अजब नियोजनातच सर्व तास बुडाले. दैनंदिन अभ्यास घेता आलीच नाही, अशी तक्रार काही शिक्षकांनी व्यक्त केली. तसेच प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका शिक्षण विभागाकडून न मिळाल्याने नाराजीही व्यक्त केली.
-दर महिन्याला होणाऱया या सराव परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका व्हॉट्सऍप किंवा ईमेलच्या माध्यमातूनच शाळांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
-पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना 30 मिनिटांत 14 तर सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना 16 प्रश्न सोडवायचे आहेत.
विद्यार्थ्यांसाठी तणावाची परीक्षा
एकाच दिवशी सर्व विषयांच्या सराव परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांसाठी तणावाचे ठरणार आहे. कोणत्याही आयोजनाशिवाय या परीक्षा घेणे म्हणजे शिक्षकांसाठीही डोकेदुखी असून त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
-साईनाथ दुर्गे,
शिक्षण समिती सदस्य, मुंबई महानगर पालिका
हा केवळ सरावच
ही केवळ सराव परीक्षाच आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देण्यात आलेली नाही. नॅसची परीक्षा घेतेवेळी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पुरविण्यात येतील. गेल्यावर्षी नॅसची परीक्षा दिवाळीनंतर घेतली होती. यंदाही त्यादरम्यानच होण्याची शक्यता आहे.
–महेश पालकर,
पालिका शिक्षणाधिकारी.


























































