अकरावी प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल, यंदा कोटय़ातील प्रवेशही ऑनलाइन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इनहाऊस, अल्पसंख्याक, मॅनेजमेंटसाठी कॉलेज प्राधान्यक्रम द्यावे लागणार

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत यंदा मोठा बदल करण्यात आला आहे. यंदा कोटय़ातील प्रवेशही ऑनलाईन होणार आहेत. ऑनलाईन अर्जाच्या भाग-2मध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईनसह इनहाऊस, अल्पसंख्याक, मॅनेजमेंट यांपैकी पर्याय निवडता येणार असून कोटय़ाद्वारे प्रवेशासाठी कॉलेज प्राधान्यक्रमही द्यावे लागणार आहेत. शून्य फेरी वेळी विद्यार्थ्यांना कोटा प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरता येतील.

विद्यार्थी कोणत्या कोटय़ातून प्रवेश घेण्यास उत्सुक आहे त्या कोटय़ाचा पर्याय ऑनलाईन अर्जात द्यावा लागत होता. विद्यार्थ्यांनी कॉलेजस्तरावर कोटय़ातून प्रवेश घेतल्यानंतर संबंधित कॉलेजकडून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची नोंद ऑनलाईन प्रवेशाच्या वेबसाईटवर करण्यात येत होती. या पद्धतीत यंदा बदल करण्यात आला असून अपेक्षित कोटा निवडण्याबरोबच विद्यार्थ्यांला त्या कोटय़ातील कॉलेज पसंतीक्रमही ऑनलाईन अर्जात नोंदवावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांनी दिलेल्या कॉलेज पसंतीक्रमानुसार संबंधित कॉलेजांना विद्यार्थ्यांची यादी पाठविली जाणार आहे. या यादीप्रमाणे कॉलेजांनी त्या कोटय़ातील उपलब्ध जागांनुसार गुणवत्ता यादी जाहीर करून प्रवेश द्यायचे आहेत.

असा आहे कोटा

इनहाऊस 10 टक्के
मॅनेजमेंट 5 टक्के
अल्पसंख्याक 50 टक्के
(ऑनलाईन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनाच कोटा प्रवेशाची संधी मिळणार आहे.)

कोटा प्रवेशात झालेला बदल
 शून्य फेरी वेळी कोटय़ांतर्गत ऑनलाईन अप्लाय करता येणार.
 विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाचा भाग दोन भरतानाच त्यांना प्रवेश घेण्यासाठी अपेक्षित कोटय़ाचा पर्याय निवडावा लागेल.
 कोटा निवडल्यानंतर त्या कोटय़ातील उपलब्ध कॉलेजांचे पसंतीक्रमही भरावे लागणार आहेत.
 पसंतीक्रमानुसार संबंधित कॉलेजांना विद्यार्थ्यांची यादी पाठविली जाईल.
 यादीप्रमाणे कॉलेजांनी त्या कोटय़ातील उपलब्ध जागांनुसार गुणवत्ता यादी जाहीर करावी.

3 ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी

अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी 3 ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार असून त्या अगोदर सर्वसाधारण यादी 28 जुलै रोजी जाहीर होणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे. मुंबई महानगर क्षेत्रासह पुणे पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर यापासून महानगरपालिका क्षेत्रासाठी हे वेळापत्रक असणार आहे. 3 ऑगस्ट रोजी ज्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज पसंतीक्रम भरुन अंतिम केले आहेत अशा विद्यार्थ्यांना या यादीत प्रवेश मिळणार आहेत. या विद्यार्थ्यांना 6 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत संबधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे विद्यालय मिळालेले आहे. त्यांनी तेथे प्रवेश घेणे अनिवार्य आहे.

कोटांतर्गत प्रवेश असे होणार

 25 ते 27 जुलै – कोटांतर्गत प्रवेशासाठी ऑनलाईन पसंती नोंदविणे
 28 जुलै – प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणे
 28 जुलै ते 30 जुलै – प्रवेश निश्चिती करणे
 31 जुलै ते 2 ऑगस्ट – कोटानिहाय रिक्त जागा विद्यालय स्तरावर जाहीर करणे आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा पसंती नोंदविणे
 3 ऑगस्ट – कोटांतर्गत पात्र विद्यार्थी यादी जाहीर करणे
 3 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट – पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे