अश्विन नंबर वन; कसोटी क्रमवारीत कायम राखले अव्वल स्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदाबाद कसोटीत पहिल्या डावात 6 विकेट टिपणाऱया हिंदुस्थानच्या रविचंद्रन अश्विनने आपले कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत कसोटीत जेम्स ऍण्डरसन दुसऱया क्रमांकावर स्थिर असून रवींद्र जाडेजा आठवरून नवव्या स्थानावर घसरला आहे.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 25 विकेट टिपणाऱया अश्विनने आपले कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखण्याची करामत केली. गेल्या आठवडय़ात अश्विन आणि ऍण्डरसन समान 859 गुणांवर कायम होते, मात्र अहमदाबाद कसोटीतील कामगिरीमुळे अश्विनच्या क्रमवारीत दहा गुणांची वाढ झाली असून तो 869 गुणांसह अव्वल स्थान संपादले आहे, तर ऍण्डरसन 859 गुणांसह दुसऱया स्थानी आहे. तसेच अक्षर पटेलनेही क्रमवारीत 34 वरून 28 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

वन डे क्रमवारीत फलंदाजीत बाबर आझम, गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि अष्टपैलू खेळाडूंमध्ये शाकिब अल हसन यांनी आपापले अव्वल स्थान कायम राखले आहे. त्याचप्रमाणे टी-20 मध्येही सूर्यकुमार यादव, वनींदु हसरंगा फलंदाजी आणि गोलंदाजीत अव्वल आहेत तर शाकिबने या क्रमवारीतही अष्टपैलूंच्या क्रमवारीतील आपले अव्वल स्थान अबाधित राखले आहे.

अष्टपैलूंच्या क्रमवारीत जाडेजाच

रवींद्र जाडेजाने कसोटीतील अष्टपैलूंच्या क्रमवारीतील आपले अव्वल स्थान अबाधित राखले आहे. तो 445 गुणांसह पहिला तर अश्विन 363 गुणांसह दुसऱया क्रमांकावर आहे. 40 महिन्यांनंतर कसोटी शतक झळकावणाऱया विराट कोहलीने 20 वरून 13 व्या स्थानावर उडी मारली आहे. सध्या सुपर फॉर्मात असलेल्या मार्नस लाबुशेनने 919 गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम असून स्टीव्ह स्मिथही दुसऱया स्थानावर स्थिर आहे.