पारसेवारांना ‘राडा’च्या माध्यमातून यश मिळेल- निशीगंधा वाड

168

सामना प्रतिनिधी । नांदेड

सचोटी आणि प्रामाणिकपणे कोणतेही काम केले तर त्यास यश निश्चितच मिळते आणि ते काम लोकांनाही प्रिय होते. रमेश पारसेवार यांनी अशाच प्रामाणिक आणि सचोटीच्या प्रयत्नांमधून ‘राडा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्याचे फळ त्यांना निश्चित मिळेल, हा चित्रपट लोकप्रिय होईल, असे सिनेअभिनेत्री निशीगंधा वाड यांनी येथे सांगितले.

रमेश पारसेवार यांच्या सूरज ग्रुपने निर्माण केलेल्या राडा या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ आमदार डी.पी.सावंत यांच्या हस्ते येथील सिटीप्राईड हॉटेलमध्ये करण्यात आला. या चित्रपटास शुभेच्छा देताना निशीगंधा वाड बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे होते. व्यासपीठावर उद्घाटक म्हणून आमदार डी.पी.सावंत, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, प्रख्यात सिनेअभिनेता मिलिंद गुणाजी, निशीगंधा वाड, राम तुप्तेवार, नरेंद्र चव्हाण आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात निवेदक अ‍ॅड.गजानन पिंपरखेडे यांनी केले.

चित्रपटात भूमिका करणारे दिग्गज कलाकार मिलिंद गुणाजी यांनी या चित्रपटास शुभेच्छा दिल्या. चित्रीकरणाचा शुभारंभ करताना आमदार डी.पी.सावंत यांनी सांगितले की, नांदेडच्या तरुण कलावंतांना दिग्गज कलाकारांकडून बरेच काही शिकायला मिळेल. नांदेड हे आता एज्युकेशन हब होत चालले आहे. इतर क्षेत्राप्रमाणेच चित्रपट क्षेत्राचेही शिक्षण येथे मिळेल, असेही सावंत म्हणाले.

स्थानिक कलाकारांना प्राधान्य देवून त्यांच्या कलेस वाव देणारे रमेश पारसेवार यांनी निर्मिलेला राडा हा मराठी चित्रपट निश्चितच बॉक्स ऑफिस हिट ठरेल, असे उद्गार जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज येथे काढले.

या समारंभास मिलिंद गुणाजी, निशीगंधा वाड, दिग्दर्शक रितेश नरवाडे, राम तुप्तेवार, आकाश शेट्टी, अजय राठोड, योगिता चव्हाण, शिल्पा ठाकरे, संजय खापरे, सिया पाटील, खलनायक गणेश यादव आदी उपस्थित होते. या चित्रपटाची गिते जाफर सागर या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गीतकाराने लिहिली आहेत. संगीतकार सागर जैन यांनी चित्रपटातील ‘मन पागल पागल झाले’ हे गीत गायिले. या चित्रपटातील गाणी स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे यांनी गायिली आहेत. दिग्दर्शन रितेश नरवाडे यांनी केले आहे.

दणकेबाज शुभारंभ
राडा या चित्रपटाचा चित्रीकरणाचा दणकेबाज शुभारंभ हॉटेल सिटीप्राईड येथे झाला. नांदेड परिसरात येत्या सहा ते सात दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण होणार असून, या चित्रपटात नांदेडच्या अनेक स्थानिक कलावंतांना देखील संधी मिळणार आहे. या सोहळ्याला शहरातील अनेक मान्यवर कलावंत, पारसेवार परिवारातील सर्व नातेवाईक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या