राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण किखे-पाटील यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा अखेर राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विखे-पाटील यांचा राजीनामा स्कीकारला असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत विखे-पाटील यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत नगरच्या जागेवरून तिढा निर्माण झाल्याने राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभेची उमेदवारी मिळवली. त्यानंतर विखे-पाटील यांनीदेखील काँग्रेसला असहकार करण्याची भूमिका घेत आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली होती.  त्यामुळे राधाकृष्ण विखेही भाजपच्या वाटेकर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. 23 एप्रिलला नगरमध्ये मतदान झाल्यानंतर अखेर त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांचाही राजीनामा

काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची शुक्रवारी संगमनेरला सभा आहे. त्यापूर्वीच ससाणे यांनी राजीनामा दिल्याने राज्यात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसला मोठा दणका बसला आहे. श्रीरामपूरमध्ये बुधवारी झालेल्या बैठकीनंतर ससाणे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली. जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हा राजीनामा स्वीकारत जिल्हाकार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.